बंगळुरू :- कॉंग्रेस नेते राहुल गांधी यांच्या विरोधात मानहानीची आणखी एक तक्रार दाखल झाली आहे. त्यावरून कर्नाटकमधील न्यायालयाने राहुल यांच्यासह मुख्यमंत्री सिद्धरामय्या, उपमुख्यमंत्री डी.के.शिवकुमार यांना समन्स बजावले आहे. त्या प्रकरणाची सुनावणी 27 जुलैला होणार आहे.
कर्नाटकमधील भाजपचे नेते एस.केशवप्रसाद यांनी 9 मे या दिवशी कॉंग्रेस नेत्यांविरोधात संबंधित तक्रार दाखल केली. त्यामध्ये जाहिरातींच्या माध्यमातून खोटे दावे करून भाजपची प्रतिमा मलिन केल्याचा आरोप करण्यात आला आहे.
विधानसभा निवडणुकीआधी कर्नाटकमधील प्रमुख वृत्तपत्रांत प्रदेश कॉंग्रेसने 5 मे या दिवशी जाहिराती दिल्या. त्या जाहिरातींमधून कर्नाटकमधील तत्कालीन भाजप सरकारने 40 टक्के भ्रष्टाचार केल्याचे आणि 4 वर्षांत 1.5 लाख कोटी रूपये लुटल्याचे दावे करण्यात आले. ते दावे निराधार आणि बदनामीकारक आहेत, असे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे.
त्यावरून बंगळुरूमधील अतिरिक्त मुख्य महानगर दंडाधिकारी न्यायालयाने कॉंग्रेस नेत्यांना समन्स बजावले. राहुल यांना याआधीच मानहानीच्या एका खटल्यात दोषी ठरवण्यात आले. त्यामुळे त्यांची खासदारकी रद्द झाली आहे.