कलबुर्गी :- कॉंग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांच्यावर आक्षेपार्ह टिप्पणी केल्याबद्दल येथील पोलिसांनी भाजपचे ज्येष्ठ नेते आणि कर्नाटकचे माजी गृहमंत्री अरगा ज्ञानेंद्र यांच्याविरोधात गुन्हा नोंदवला आहे. येथील अशोक नगर पोलीस ठाण्यात कॉंग्रेस कार्यकर्ता राजीव जाने यांनी दाखल केलेल्या तक्रारीच्या आधारे गुरुवारी एफआयआर नोंदवण्यात आला.
ज्ञानेंद्र यांच्यावर आयपीसीच्या कलम 504 (शांतता भंग करण्याच्या हेतूने हेतुपुरस्सर बदनामीकारक वक्तव्य करणे) नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे आणि हा खटला शुक्रवारी शिवमोग्गा जिल्ह्यातील तीर्थहल्ली येथे हस्तांतरित केला जाईल, जिथे ही घटना घडली आहे, असे अधिकाऱ्याने सांगितले.
दरम्यान, 1 ऑगस्ट रोजी तिर्थहळ्ळी येथे झालेल्या आंदोलनादरम्यान भाजपच्या ज्येष्ठ आमदाराने खर्गे यांच्या वर्णाचा आणि ते ज्या प्रदेशातील आहेत त्याबद्दल आक्षेपार्ह टीका केली होती.
कॉंग्रेस कार्यकर्त्यांनी बुधवारी बेंगळुरूमध्ये ज्ञानेंद्र यांच्या विरोधात निदर्शने केली, त्यांच्या विरोधात घोषणाबाजी केली, तर पक्षाच्या नेत्यांनी त्यांच्या मानसिक तंदुरुस्तीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले.
दरम्यान आपल्या वक्तव्यामुळे कोणाला वाईट वाटले असेल तर आपण खेद व्यक्त करतो असे ज्ञानेंद्र यांनी म्हटले आहे. ते म्हणाले की, मी मल्लिकार्जुन खर्गे यांच्या विरोधात कधीच बोललो नाही, त्यांच्यावर टीका करण्याइतपत मी मोठा आहे असे मला वाटत नाही. मी नेहमीच त्यांच्या ज्येष्ठतेचा आणि अनुभवाचा आदर राखून बोलतो. माझा हेतू मल्लिकार्जुन खर्गे किंवा खांद्रे यांना दुखावण्याचा नव्हता.कोणाच्याही भावना दुखावण्याचा माझा हेतू नव्हता, पण कोणाच्या भावना दुखावल्या गेल्या असतील तर मी दिलगिरी व्यक्त करतो, असे सांगून त्यांनी सारवासारव करण्याचा प्रयत्न केला आहे.