नवी दिल्ली – हिमाचल प्रदेशात पावसाचा कहर अजूनही सुरूच आहे. त्याचबरोबर कालका शिमला राष्ट्रीय महामार्ग गेल्या अनेक दिवसांपासून दरड कोसळल्यामुळे बंद आहे. अशात आज पुन्हा कालका शिमला राष्ट्रीय महामार्गावर दरड कोसळली. समोर आलेल्या माहितीनुसार, कालका शिमला राष्ट्रीय महामार्गावर चक्की वळणाजवळ शनिवारी आणखी एक भूस्खलन झाल्याचं पाहायला मिळालं. त्यामुळे सध्या फोरलेन सुरू होण्याची शक्यता नाही.
शनिवारी दुपारपर्यंत रस्ता दोन्हही टोकांपर्यंत क्लेअर करण्याचं काम सुरु आहे. काही प्रमाणात रस्ता मोकळा झाला परंतु यादरम्यान अचानक डोंगरावरून पुन्हा मोठा ढिगारा खाली कोसळू लागला. अवघ्या 30 सेकंदात हजारो टन ढिगारा टेकडीवरून रस्त्यावर आला. सतत येत असलेल्या ढिगाऱ्यांमुळे कालका-शिमला रेल्वे मार्गही धोक्यात आला आहे. ज्या ठिकाणी भूस्खलन होत आहे त्या ठिकाणाहून सुमारे 500 मीटर अंतरावर रेल्वे मार्ग जात आहे.
टेकडीवरून वारंवार दरड आणि दगड पडत असल्याने संरचनेचे कामही सुरू होत नाही. एनएचएआयचे प्रकल्प संचालक आनंद दहिया सांगतात की, चक्की वळणाजवळ चौपदरीकरणाचे काम सुरू आहे. लवकरात लवकर हा मार्ग वाहनांसाठी पूर्ववत करण्यात येईल, यासाठी प्रयत्न केले जात आहेत. 2 ऑगस्ट रोजी कालका-शिमला राष्ट्रीय महामार्गावरील चक्की वळणाजवळ दरड कोसळली होती.
कालका-शिमला राष्ट्रीय महामार्ग बंद झाल्यानंतर, सोलन-शिमला या मार्गासाठी ब्रेड आणि दुधाचा पुरवठा बुधवार, 2 ऑगस्ट रोजी ठप्प झाला होता. बुधवारीही शहरात जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा होऊ शकला नाही. अशा परिस्थितीत दूध आणि ब्रेडच्या पुरवठ्यावर परिणाम होऊ शकतो.