इस्लामाबाद – पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांना तोषकाना भ्रष्टाचार प्रकरणी 3 वर्षांची शिक्षा सुनावली गेली आहे. त्यामुळे पोलिसांनी इम्रान खान यांना अटक केली आहे. पाकिस्तानचे पंतप्रधान असताना तोषकानातील भेटवस्तूंची परस्पर विक्री केल्याबद्दल भ्रष्टाचाराच्या प्रकरणात इम्रान खान यांना इस्लामाबाद जिल्हा न्यायालयाने त्यांच्या अनुपस्थितीत दोषी ठरवून 3 वर्षांची शिक्षा सुनावली.
न्यायालयाने इम्रान खान यांना एक लाख रुपयांचा दंड देखील ठोठावला आहे. जर हा दंड भरला गेला नाही. तर इम्रान खान यांना आणखून 6 महिने तुरुंगात रहावे लागणार आहे. न्यायालयाने हा निकाल सुनावल्यानंतर पोलिसांनी इम्रान अटक केली आणि त्यांची रवानगी इस्लामाबादला करण्यात आली आहे. त्यांना आदियाला तुरुंगात ठेवायचे का अन्य कोठे ठेवायचे, याचा निर्णय अद्याप होणे बाकी आहे.
इम्रान खान यांच्या विरोधात मालमत्तेची चुकीची घोषणा करण्याचा आरोप सिद्ध झाला आहेस असे न्यायालयाने म्हटले आहे. इम्रान यांनी तोषकानातील भेटवस्तूंबाबत निवडणूक आयोगाला जाणीवपूर्वक चुकीची माहिती दिली. त्यामुळे निवडणूक कायद्याचा भंग केल्याबद्दल भ्रष्ट व्ययवहाराच्या आरोपात ते दोषी आहेत, असे न्यायाधीश हुमायूं दिलावर यांनी म्हटले आहे.
न्यायालयाच्या आदेशांची प्रत इस्लामाबाद पोलीस प्रमुखांना पाठवल्यानंतर इस्लामाबाद पोलीस महानिरीक्षकांनी तात्काळ इम्रान खान यांच्या नावे अटक वॉरंट काढले. नंतर पंजाब पोलिसांच्या सहकार्याने इस्लामाबाद पोलिसांनी इम्रान खान यांना लाहोरमधील झमान पार्क येथील निवास्थानातून अटक केली. इम्रान खान यांना हेलिकॉप्टरने इस्लामाबादला नेण्यात आल्याचे “पीटीआय’च्या कायदाविषयक पथकाने म्हटले आहे.
वारंवार अनुपस्थित राहिल्याबद्दल नाराजी
इम्रान खान सुनावणीला वारंवार अनुपस्थित राहिल्याबद्दल न्यायालयाने आज तीव्र नाराजी व्यक्त केली. इम्रान खान यांना अनुपस्थित राहण्यासाठी न्यायालयाकडून वारंवाहर सवलत देण्यात आली होती. आजच्या सुनावणीला इम्रान खान किंवा त्यांचे वकील यांच्यापैकी कोणीही उपस्थित नव्हते.
वकील अन्य सुनावणीमध्ये व्यस्त असल्याचे कनिष्ठ वकीलांनी न्यायालयात सांगितले. दिवसभरात 3 वेळा सुटी घेऊनही खान यांचे वकील उपस्थित राहिले नाहीत. त्यानंतर इम्रान खान यांच्या अनुपस्थितच निर्णय जाहीर करण्यात आला.
तीन महिन्यात दुसऱ्यांदा अटक
इम्रान खान यांना गेल्या तीन महिन्यात दुसऱ्यांदा अटक करण्यात आली आहे. मात्र गेल्यावेळी ज्याप्रमाणे प्रखर विरोध झाला होता, तसा यावेळी झाला नाही. 9 मे रोजी अल कादिर ट्रस्ट भ्रष्टाचार प्रकरणी इम्रान खान यांना उच्च न्यायालयाच्या आवारातून अटक करण्यात आली होती.
त्यानंतर पाकिस्तान तेहरिक ए इन्साफ पक्षाच्या कार्यकर्त्यांच्यावतीने देशभर उग्र निदर्शने करण्यात आली होती. इम्रान खान यांच्याविरोधात 150 खटले दाखल आहेत. त्यापैकी बहुतेक खटले भ्रष्टाचार, दहशतवाद आणि हिंसाचाराला चिथावणी देण्याशी संबंधित आहेत.