बंगळुरू – कर्नाटकात त्रिशंकू स्थितीचा अंदाज वर्तवण्यात आल्याच्या पार्श्वभूमीवर माजी मुख्यमंत्री आणि जेडीएसचे नेते एच.डी.कुमारस्वामी यांनी अतिशय महत्वपूर्ण भाष्य केले. आर्थिक चणचणीमुळे जेडीएसला 25 जागांवर फटका बसू शकेल. तसे असले तरी आमचा पक्षच किंग ठरेल, असा दावा त्यांनी केला.
भाजप, कॉंग्रेस आणि जेडीएसमुळे कर्नाटक विधानसभा निवडणुकीला तिरंगी लढतीचे स्वरूप झाले. अर्थात, प्रमुख लढत भाजप आणि कॉंग्रेसमध्येच असल्याचे मानले गेले. कुणालाच बहुमत नसणारी त्रिशंकू स्थिती निर्माण झाल्यास जेडीएस किंगमेकर ठरण्याची शक्यताही वर्तवण्यात आली. मात्र, ताकदीने निवडणूक लढवलेल्या जेडीएसला आपल्याला दुर्लक्षित करणे बहुधा मान्य नाही.
कुमारस्वामी यांनी एका ठिकाणी पत्रकारांशी बोलताना मांडलेली भूमिका तसेच सूचित करणारी आहे. जेडीएसला आवश्यक तितक्या देणग्या मिळाल्या नाहीत. त्यामुळे निवडून येण्याची क्षमता असणाऱ्या काही उमेदवारांना पक्षनिधी उपलब्ध करता येऊ शकला नाही. त्याचा फटका बसू शकतो. मात्र, भाजप आणि कॉंग्रेसपेक्षाही अधिक जागा जेडीएस मिळवेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. कर्नाटकमध्ये विधानसभेच्या एकूण 224 जागा आहेत. त्यातील 37 जागा जेडीएसने मागील निवडणुकीत (वर्ष 2018) मिळवल्या होत्या.