नवी दिल्ली – उत्तरप्रदेश विधानसभा निवडणुकीतील पहिल्या टप्प्यासाठी कॉंग्रेसने सोमवारी 30 स्टार प्रचारकांची यादी जाहीर केली. त्यामध्ये आक्रमक भाषण शैलीसाठी ओळखले जाणारे तरूण नेते कन्हैय्या कुमार यांचाही समावेश आहे.
उत्तरप्रदेशात विधानसभा निवडणुकीसाठी एकूण सात टप्प्यांत मतदान होईल. त्यातील पहिल्या टप्प्यासाठी कॉंग्रेसने जाहीर केलेल्या स्टार प्रचारकांच्या यादीत अपेक्षेप्रमाणे पक्षाध्यक्षा सोनिया गांधी, माजी पंतप्रधान मनमोहन सिंग आणि माजी अध्यक्ष राहुल गांधी यांना स्थान मिळाले आहे.
पक्षाच्या उत्तरप्रदेश प्रभारी प्रियंका गांधी, राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत, छत्तिसगढचे मुख्यमंत्री भुपेश बघेल, तरूण नेते सचिन पायलट यांनाही स्टार प्रचारक करण्यात आले आहे.
पक्षाच्या नाराज मानल्या जाणाऱ्या 23 नेत्यांच्या गटातील काही जणांनाही स्टार प्रचारकांच्या यादीत स्थान देण्यात आले आहे. त्यामध्ये गुलाम नबी आझाद, भुपिंदरसिंह हुडा आणि राज बब्बर यांचा समावेश आहे. संबंधित गटाने कॉंग्रेसच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह उपस्थित करून व्यापक संघटनात्मक फेररचनेची मागणी केली होती.