कन्हैय्या यांच्या काँग्रेस प्रवेशामुळे विरोधकांच्या महाआघाडीत फाटाफूट होण्याची चिन्हे

कॉंग्रेसचा बिहारमध्ये राजदशी दुरावा?

पाटणा – बिहार विधानसभेच्या दोन जागांसाठी होणाऱ्या पोटनिवडणुकीसाठी कॉंग्रेस आणि राजदने स्वतंत्र उमेदवार रिंगणात उतरवले. त्यामुळे त्या मित्रपक्षांमध्ये दुरावा निर्माण होऊन विरोधकांच्या महाआघाडीत फाटाफुटीची शक्‍यता बळावल्याचे संकेत मिळत आहेत.

पोटनिवडणुकीसाठी राजदने तीन दिवसांपूर्वी उमेदवारांच्या नावांची घोषणा केली. त्याआधी कॉंग्रेसशी चर्चा झाल्याचाही दावा राजदकडून करण्यात आला. मात्र, तो दावा फेटाळून कॉंग्रेसने मंगळवारी आपले उमेदवार जाहीर केले. त्यामुळे दोन्ही मित्रपक्षांतील संबंध ताणले गेल्याचे मानले जात आहे.

कॉंग्रेसमध्ये नुकताच कन्हैय्या कुमार या तरूण नेत्याने प्रवेश केला. ती घडामोड राजदला रूचलेली नसल्याचे समजते. राजदचे नेते तेजस्वी यादव यांचा भविष्यातील तगडा प्रतिस्पर्धी म्हणून कन्हैया यांच्याकडे पाहिले जाते.

त्यामुळे कन्हैय्या यांना प्रवेश दिल्यावरून कॉंग्रेसवर राजद नाराज असल्याची चर्चा आहे. त्यातून दोन्ही पक्षांनी पोटनिवडणूक स्वतंत्रपणे लढवण्याचा निर्णय घेतल्याचे समजते. त्यामुळे विरोधकांच्या महाआघाडीचे घटक असणाऱ्या डाव्या पक्षांची नेमका कुणाला पाठिंबा द्यायचा याविषयी गोची होण्याची शक्‍यता आहे.

बिहारमध्ये वर्षभरापूर्वीची विधानसभा निवडणूक विरोधी पक्षांनी महाआघाडी स्थापन करून एकत्रितपणे लढवली.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Comments are closed.