नवी दिल्ली – काँग्रेस नेते कन्हैय्या कुमार व भाजप आमदार राम कदम यांच्यात चर्चेदरम्यान झालेल्या गर्मागर्मीचा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होतोय. या व्हिडिओमध्ये प्रथम भाजप आमदार राम कदम कन्हैय्या कुमारला ‘भारत माता का की जय’ घोषणा देण्याचं चॅलेंज देताना दिसतायेत.
कन्हैय्या कुमार हे चॅलेंज पूर्ण करत ‘भारत माता की जय’ अशी घोषणा देतो. नंतर कन्हैय्या राम कदम यांना, ‘गोडसे मुर्दाबाद’ची घोषणा देण्याचं चॅलेंज करतो. कन्हैय्याने दिलेलं हे चॅलेंज मात्र राम कदम पूर्ण करू शकत नाहीत. या व्हिडीओवरून आता राम कदम यांना समाज माध्यमांवर प्रश्न विचारले जातात आहेत.
नेमकं काय झालं?
सोशल मीडियावर व्हायरल झालेला हा व्हिडीओ न्यूज १८ च्या चौपाल या कार्यक्रमातील आहे. कार्यक्रमामध्ये आमदार राम कदम यांनी कन्हैय्या कुमार यांना, ‘भारत माता की जय बोलता का?’, एकदा बोलून दाखवा…असं आव्हान दिलं. तसेच कन्हैय्याच्या एका जुन्या वक्तव्याची आठवण करुन दिली. “तुम्ही १० फेब्रुवारी २०१६ मध्ये म्हटलं होतं की, “माझ्या मुलाचं नाव भारत माता की जय ठेवेन, जेणेकरुन तो शाळेत गेल्यावर फी माफ करतील”
यावर कन्हैय्या कुमारने ‘भारत माता की जय’ म्हणत त्याला दिलेलं चॅलेंज पूर्ण केलं. पुढे त्याने कदम यांना, तुम्ही गांधींना मानता का? असा प्रश्न विचारला. त्यावर कदम यांनी आम्ही गांधीजींना मानतो असं उत्तर दिलं. त्यांच्या या उत्तरावर त्वरित पलटवार करत कन्हैय्याने राम कदम यांना, “मग म्हणा गोडसे मुर्दाबाद’ असं चॅलेंज देत कात्रीत पकडलं. राम कदम शेवटपर्यंत हे चॅलेंज पूर्ण करू शकले नाहीत.
कन्हैय्याच्या चॅलेंजला उत्तर देताना कदम यांनी केवळ, ‘आम्ही गोडसे जिंदाबाद म्हणत नाही त्यामुळे गोडसे मुर्दाबाद म्हणण्याचा प्रश्नच नाही.’ अशी सारवासारव केली. कदम यांच्या या उत्तरावर निशाणा साधत कन्हैय्याने, ‘तुम्हाला भीती वाटतेय का? पक्षातून हकालपट्टी होईल अशी भीती वाटतेय का?’ असे प्रश्न उपस्थित केले.
राम कदम यांनी अखेरपर्यंत गोडसे मुर्दाबाद ही घोषणा न दिल्याने आता त्यांचा व्हिडीओ सोशल मीडियामध्ये व्हायरल झाला असून अभिनेत्री स्वर भास्करसह अनेकांनी त्यांच्यावर निशाणा साधला आहे.