चेन्नई – ओमायक्रॉनमुळे अनेक ठिकाणी शनिवारी आणि रविवारी अधिक कठोर निर्बंध लागू करण्यात आलेत. असे असतानाच तामिळनाडूमध्ये लॉकडाउनदरम्यान शनिवार आणि रविवारी मंदिरे बंद असल्याने पुजाऱ्यांनी बंद मंदिरांबाहेर रस्त्यावरच लग्न लावून दिल्याचा प्रकार मागील दोन दिवसांमध्ये घडला आहे.
तामिळनाडूमधील कुड्डलोर जिल्ह्यामधील एका प्रसिद्ध मंदिरासमोर रस्त्यावरच पुजाऱ्यांनी रविवारी काहीजणांची लग्न लावून दिली. करोनाच्या पार्श्वभूमीवर शनिवारी आणि रविवारी मंदिरांमध्ये गर्दी होऊ नये म्हणून आठवड्यातून तीन दिवस मंदिर बंद ठेवण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला. मात्र स्थानिक लोक मंदिर बंद ठेवण्याच्या निर्णयामगील मूळ उद्देशालाच हरताळ फासताना दिसत आहेत. कुड्डालोर तिरवंतीपुरम श्री देवनाथस्वामी मंदिराच्या समोरच्या रस्त्यावर तसेच मंदिराच्या आजूबाजूच्या परिसरामध्ये रविवारी जागेजागी लग्न लावून देण्यात आली.
मंदिरांमध्ये लग्न लावून देणाऱ्या पुजाऱ्यांनी रस्त्यावरच हे विवाह लावून दिल्याचे पहायला मिळाले. रविवारी तामिळ कालगणनेनुसार थाई महिन्यामधील सर्वात पवित्र दिवस म्हणजेच शुभ मुहूर्त नालचा दिवस होता. हा दिवसबरोबर रविवारी आल्याने मंदिर बंद असतानाही अनेक जोडप्यांवर मंदिराबाहेर रस्त्यावरच लग्न करण्याची वेळ आली. भगवान विष्णुला समर्पित करण्यात आलेल्या या मंदिरामध्ये लग्न करणे हे फारच शुभ मानले जाते. त्यामुळेच या ठिकाणी लग्न करण्यासाठी इच्छूक असलेल्यांनी मोठी गर्दी केल्याचे पहायला मिळाले.
23 जानेवारी रोजी तामिळनाडूमध्ये 30 हजार 580 करोना रुग्ण आढळून आले. तामिळनाडूमध्ये रोज रात्री दहा ते पहाटे पाचदरम्यान नाईट कर्फ्यूची घोषणा करण्यात आलीय. 9 जानेवारी रोजी तामिळनाडूमध्ये एका दिवसाचा लॉकडाऊन जाहीर करण्यात आला होता.