मुंबई – बॉलीवूड अभिनेत्री कंगना राणावत आणि तिची बहीण रंगोली चंदेल या दोघींना मुंबई पोलिसांनी बुधवारी समन्स बजावले. त्यांना पुढील आठवड्यात चौकशीसाठी हजर राहण्यास सांगण्यात आले आहे. प्रक्षोभक वक्तव्ये करून आणि सोशल मीडियाच्या माध्यमातून भिन्न समुदायांत विद्वेष निर्माण करत असल्याचा दोन्ही भगिनींवर आरोप आहे.
त्याप्रकरणी दाखल झालेल्या तक्रारीवरून मुंबईतील न्यायालयाने काही दिवसांपूर्वी तपास करण्याचा आदेश दिला. त्यानंतर मुंबई पोलिसांनी कंगना आणि रंगोली यांच्याविरोधात गुन्हा दाखल केला. आता त्यांची चौकशी करण्यासाठी मुंबई पोलीस सरसावले आहेत.
चौकशीसाठी त्या भगिनींना सोमवारी आणि मंगळवारी हजर राहण्यास सांगण्यात आले आहे. कंगना आणि रंगोली यांनी मागील काही काळात बॉलीवूडसंदर्भात केलेले अनेक ट्विट वादग्रस्त ठरले.