बारामती – माळेगाव (ता. बारामती) कारखान्याच्या अध्यक्षपदावरुन आजी-माजी अध्यक्ष व संचालकांमध्ये कलगीतुरा रंगला आहे. राष्ट्रवादीने घेतलेला अध्यक्षपदाचा पदभार बेकायदेशीर असल्याचे रंजन तावरेंचे म्हणणे आहे. कारखान्याच्या अध्यक्षपदाचा स्वीकारलेला पदभार उच्च न्यायालय आणि साखर आयक्तांच्या निर्देशानुसार स्वीकारल्याचे राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या वतीने सांगितले आहे.
कारखान्याच्या विश्रामगृहात पत्रकारांशी बोलताना रंजन तावरे म्हणाले की, बाळासाहेब तावरे, तानाजी कोकरे यांनी अध्यक्ष, उपाध्यक्षपदाचा स्वीकारलेला कार्यभार बेकायदेशीरपणे असून उच्च न्यायालयाचा अवमान करणारा आहे. करोना विषाणुजन्य परिस्थितीमुळे लॉकडाऊनमुळे न्यायालयाने सर्वच याचिकांवरील अंतरीम आदेश 30 एप्रिलपर्यंत कायम केले आहेत. त्यामुळे माळेगाव कारखान्याच्या नवनियुक्त संचालकांनी मुदत पूर्ण होईपर्यंत जुन्या संचालकांना अडथळा न आणण्याचे दिलेले आदेश 30 एप्रिलपर्यंत कायम राहणार आहेत. शनिवारी (दि. 4) पहाटे साखर आयुक्तांना पत्र पाठविले आहे. मात्र, साखर आयुक्तांनी अद्याप पत्राला कोणतेही उत्तर दिलेले नाही, त्यामुळे अद्याप कारखान्याच्या अध्यक्षपदाचे पदसिद्ध अधिकार माझ्याकडेच असल्याचे तावरे यांचे म्हणणे आहे.
यावेळी नवनिर्वाचित अध्यक्ष बाळासाहेब तावरे यांनी उच्च न्यायालय, साखर आयुक्तांच्या निर्णयानुसार कायदेशीररित्या पदभार स्वीकाराला आहे. मात्र, रंजन तावरे यांचे वर्तनाने कारखान्याच्या गौरवाला गालबोट लागेल, असे त्यांचे कृत्य आहे.
कारखान्याचे संचालक योगेश जगताप म्हणाले की, सहकाराचा अनुभव असणारे ज्येष्ठ नेते चंद्रराव तावरे यांनी नवनिर्वाचित अध्यक्ष तावरे यांच्या अध्यक्षतेखाली संचालक मंडळाच्या बैठकीस प्रकृती अस्वास्थ्यामुळे उपस्थित राहु शकत नसल्याचे दिलेले पत्र म्हणजे नवनिर्वाचित अध्यक्षांना मंजुरी दिल्यासारखेच आहे. रंजन तावरे यांनी गुरुंचा अनुभवाचा मान राखावा, असा टोला संचालक जगताप यांनी लगावला आहे. यावेळी उपाध्यक्ष तानाजी कोकरे यांच्यासह नवनिर्वाचित संचालक नितीन सातव, मदन देवकाते, सुरेश खलाटे, अनिल तावरे आदींनी राष्ट्रवादी कॉंग्रेसची बाजू मांडली.