रोम – युव्हेन्ट्सने ऍटलांटाचा 2-1 असा पराभव करत इटालियन चषक फुटबॉल स्पर्धेचे जेतेपद पटकावले. युव्हेन्ट्सचे हे इटालियन चषकाचे 14 वे तर अव्वल खेळाडू ख्रिस्तियानो रोनाल्डोचे पहिले विजेतेपद ठरले.
दुजान कुलुसेवस्की याने 31व्या मिनिटाला युव्हेन्ट्सचे खाते उघडल्यावर ऍटलांटाने रस्लन मलिनोवस्कीने 41 व्या मिनिटाला केलेल्या गोलमुळे सामन्यात बरोबरी साधली. मात्र, फेडेरिको चिएसा याने 73 व्या मिनिटाला निर्णायक गोल करत युव्हेन्ट्सला विजेतेपद मिळवून दिले. युव्हेन्ट्सचे हे मोसमातील दुसरे विजेतेपद ठरले आहे.
पीएसजीचे वर्चस्व कायम
किलियन एम्बाप्पेच्या शानदार कामगिरीमुळे पॅरिस सेंट-जर्मेनने (पीएसजी) मोनॅकोचा 2-0 असा पराभव करत फ्रेंच चषक फुटबॉल स्पर्धेचे विजेतेपद राखले. त्यांचे हे 14 वे विजेतेपद ठरले. 2010 साली पॅरिस सेंट-जर्मेनने 1-0 असा विजय मिळवला होता, तर 1985 साली मोनॅकोने 1-0 अशी बाजी मारली होती.