रोज आढळताहेत रुग्ण : दीड महिन्यात वाढले 212 रुग्ण
पिंपरी – पिंपरी-चिंचवड शहरात करोना बाधित रुग्णांचा आकडा वाढत चालला आहे. गेल्या दीड महिन्यात सोमवार (दि. 18) सायंकाळपर्यंतच्या आकडेवारीनुसार 212 रुग्ण वाढले. 8 एप्रिलपासून दररोज करोना बाधित रुग्ण सापडत आहेत. केवळ 20 एप्रिलला त्यामध्ये खंड पडला. म्हणजे जवळपास 1 महिना 10 दिवसांच्या कालावधीत करोनाने दररोज बाधित होणारे रुग्ण सापडल्याने रुग्ण संख्येने दोनशेचा आकडा ओलांडला.
पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या कोविड डॅशबोर्डनुसार, पिंपरी-चिंचवडमध्ये मार्च अखेरपर्यंत केवळ 14 रुग्ण होते. एप्रिल महिन्यात 101 रुग्ण वाढले. तर, मे महिन्यात अवघ्या 18 दिवसांमध्ये 99 रुग्ण वाढले. तथापि, एकूण 226 रुग्णांपैकी आत्तापर्यंत 131 रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. शहरामध्ये सुरवातीला 11 मार्चला 3 करोनाबाधित रुग्ण सापडले. 19 मार्चपर्यंत करोनाबाधित रुग्णांची संख्या वाढून 12 इतकी झाली. 30 मार्चपर्यंत रुग्ण संख्येत कोणतीच वाढ झाली नव्हती.
उलट त्यातील 9 रुग्ण बरे होऊन घरी परतले. 31 मार्चपासून मात्र रुग्ण संख्येत वाढ होण्यास सुरुवात झाली. विदेशातून आलेले नागरिक, दिल्लीतील “मरकज’च्या कार्यक्रमात सहभागी व्यक्तींच्या संपर्कात आलेल्या नागरिकांमुळे करोनाचे रुग्ण वाढण्यास सुरुवात झाली. एप्रिल महिन्यात 1 तारखेला केवळ 14 रुग्ण होते. महिना अखेरपर्यंत रुग्ण संख्येने शंभरी ओलांडली. 30 एप्रिलपर्यंत एकूण 115 रुग्ण होते.
एप्रिल महिन्यात 101 रुग्ण वाढले. 8 एप्रिलपासून दररोज करोना बाधित रुग्ण वाढत आहेत. त्यामध्ये केवळ 20 एप्रिलला एक दिवसाचा खंड पडला. मे महिन्यात 1 तारखेला 118 रुग्ण होते. तर, सोमवारी (दि. 18) सायंकाळपर्यंत ही रुग्ण संख्या 226 पर्यंत पोहचली. म्हणजे अवघ्या 18 दिवसांमध्ये 111 रुग्ण वाढले आहेत. तथापि, आत्तापर्यंत 131 रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. तर, चौघांचा मृत्यू झाला आहे.
सध्या 91 रुग्णांवर उपचार सुरू आहेत. सुरुवातीला करोनाबाधित रुग्णसंख्या दर दहा दिवसांनी दुप्पट होत होती. 30 मार्चपर्यंत 12 रुग्ण होते. तर, अवघ्या दहा दिवसांत म्हणजेच 9 एप्रिलला रुग्ण दुप्पट होत 24 इतके झाले. त्यानंतर 7 दिवसाने म्हणजे 16 एप्रिलला 51 रुग्ण संख्या होती. तर, त्यानंतर 11 दिवसाने 27 एप्रिलला 103 रुग्ण झाले. दरम्यान, आता 21 दिवसांनी आज सायंकाळपर्यंत 226 रुग्णांना करोनाची लागण झाली आहे.
एप्रिल महिन्याच्या तीस दिवसांत केवळ सहा वेळा एका दिवसात रुग्णसंख्या सहापेक्षा अधिक झाली. परंतु मे महिन्याच्या 18 दिवसांत सात वेळा एका दिवसात अर्धा डझनहून अधिक रुग्ण आढळून आले आहेत.