शेवगाव – शेतात जाण्यासाठी वहिवाट रस्ता मिळावा यासाठी तहसीलदार यांच्याकडे दाखल असलेल्या दाव्याच्या निकालाची प्रत मिळावी यासाठी मागणी केलेल्या शेतकऱ्याकडून 15 हजाराची रक्कम स्वीकारताना आज सायंकाळी शेवगाव तहसील कार्यालयातील कनिष्ठ लिपीक मनोहर आसाराम डोळस यांस नगर लाचलुचपत विभागाच्या पथकाने रंगेहाथ पकडले.
याबाबत समजलेली माहिती अशी की, तक्रारदार शेतकऱ्याने शेतात जाण्यासाठी वहिवाट रस्ता मिळावा यासाठी शेवगाव तहसीलदार यांच्याकडे दावा दाखल केला होता. त्याच्या निकालाची प्रत संबंधित शेतकऱ्याला देण्यासाठी तहसील कार्यालयातील कनिष्ठ लिपीक असलेल्या डोळस यांनी 15 हजार रुपयाच्या रकमेची मागणी केली असता संबंधिताने याबाबत अहमदनगर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार नोंदवली होती. आज सोमवारी (दि.3) डोळस यांनी ही रक्कम पंच साक्षीदाराच्या समक्ष स्वीकारली असता त्यांना रंगेहाथ पकडण्यात आले.
लाचलुचपत प्रतिबंधक नाशिक विभागाचे अधीक्षक सुनील करासने, अतिरिक्त अधीक्षक निलेश सोनवणे, उपअधीक्षक किशोर चौधरी, अहमदनगर यांचे मार्गदर्शनाखाली नगर कार्यालयातील पोलीस निरीक्षक दिपक करांडे, पोलीस निरीक्षक शाम पोरे, पो.हे. कॉं. तन्वीर शेख, रमेश चौधरी, प्रशांत जाधव, राधा खेमनर, अशोक रक्ताटे यांच्या पथकाने ही कारवाई केली.