लॉकडाऊन नियम शिथिल झाल्यावर पुन्हा करणार वाटप
पुणे बार असो. कडून 350 ज्युनिअर वकिलांना मदत
पुणे – लॉकडाऊन कडक केल्यामुळे ज्युनिअर वकिलांना अन्नधान्याचे किट वाटण्यास अडचण निर्माण झाली आहे. यासाठी बाहेर पडलेल्या वकिलांना पोलिसांनी माघारी घरी पाठविले. आतापर्यंत सुमारे 350 वकिलांना किटचे वाटप करण्यात आले असून, लॉकडाऊन शिथिल झाल्यानंतर उर्वरीत 150 ते 175 जणांना किटचे वाटत करण्यात येणार असल्याचे पुणे बार असोसिएशनचे अध्यक्ष ऍड. सतीश मुळीक यांनी सांगितले.
करोनाने संपूर्ण जगात धुमाकूळ घातला आहे. अनेकांसमोर आर्थिक समस्या निर्माण झाली आहे. त्याला न्यायालयात प्रॅक्टिस करणारे तरुण वकील ही अपवाद राहिलेले नाहीत. अशा तरुण वकिलांसाठी पुणे बार असोसिएशनतर्फे मदतीचा हात देण्यात आला आहे. असोसिएशनतर्फे एक महिना पुरेल एवढे अन्नधान्य आणि किराणा असलेले कीट देण्यात येत आहेत. 525 वकिलांनी या किटसाठी बार असोसिएशनकेडे संपर्क आहे. लॉकडाऊनच्या सुरूवातीच्या काळात वकिलांकडून जास्त मागणी नव्हती. मात्र, आता मागणी वाढत चालली आहे. आणखी वकिलांकडून संपर्क होण्याची शक्यता असल्याचे पुणे बार असोसिएशनचे अध्यक्ष ऍड. सतिश मुळीक यांनी सांगितले.
देशात करोनाचा संसर्ग वाढत आहे. या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि राज्याचे मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी लॉकडाऊन पुकारला आहे. या पार्श्वभूमीवर न्यायालये बंद आहेत. सकाळी 11 ते दुपारी 2 या वेळेत केवळ महत्त्वाच्या प्रकरणात सुनावणी होत आहे. आणखी काही दिवस अशीच परिस्थिती राहण्याची शक्यता आहे. यामुळे बारचे अध्यक्ष मुळीक, उपाध्यक्ष ऍड. योगेश तुपे, ऍड. सचिन हिंगणेकर, सचिव ऍड. घनश्याम दराडे, ऍड. विकास बाबर, खजिनदार ऍड. भाग्यश्री गुजर-मुळे, ऍड. हिशोब तपासणीस ऍड. ओमकार चव्हाण यांच्याकडून या योजनेतंर्गत पाच वर्षांपेक्षा कमी प्रॅक्टिस असलेल्या वकिलांना अन्नधान्य आणि किराणा देण्याचा उपक्रम सुरू करण्यात आला आहे.
यासाठी अध्यक्ष मुळीक यांनी दोन लाख रुपये दिले असून, इतर सिनिअर वकिलांनीही मोठी मदत केली आहे. मूळातच ज्युनिअर वकिलांना काम कमी असते. सिनिअर वकील त्यांना गुजराणासाठी मदत करत असतात. मात्र, आता न्यायालय बंद असल्याने गुजराण कशी करायची, असा प्रश्न ज्युनिअर वकिलांसमोर निर्माण झाला आहे. या पार्श्वभूमीवर बारची ही योजना महत्त्वपूर्ण ठरत आहे. असोसिएशनतर्फे शहरात 11 विभाग केले असून, त्या त्या विभागात राहणाऱ्या वकिलांना मदत देण्यात येत आहे. लॉकडाऊन शिथिल झाल्यानंतर संपर्क केलेल्या सर्व वकिलांना किटचे वाटप करण्यात येणार असून, धोका पत्करून कोणीही घराबाहेर पडू नये, असे आवाहन अध्यक्ष मुळीक केले आहे.