नवी दिल्ली : संपूर्ण जग कोरोनाशी लढा देत आहे तर भारताच्या सीमेवर जवानांवर हल्ल्याचा कट रचला जात आहे. जम्मू आणि काश्मीरच्या शोपियांमध्ये पोलिसांवर हल्ला करण्याच्या तयारीत असलेल्या जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक करण्यात आली आहे. जम्मू-काश्मीरच्या वाची येथे जवानांवर हल्ला करण्याचा कट या दहशतवाद्यांनी रचला होता. अटक केलेल्या दहशतवाद्यांकडून पोलिसांनी शस्त्रसाठा जप्त केला आहे.
सोमवारी शोपियां जिल्ह्यात जम्मू-काश्मीर पोलिसांनी ५५ राष्ट्रीय रायफल्स आणि सीआरपीएफ जवानांसोबत एक संयुक्तरित्या अभियान चालवले. या अभियाना दरम्यान पोलिसांनी जैश-ए-मोहम्मद या दहशतवादी संघटनेच्या दोन दहशतवाद्यांना अटक केली. वाची येथे तैनात असलेल्या जवानांवर ते हल्ला करणार होते. दहशतवाद्यांकडून एक पिस्तूल आणि दोन ग्रेनेड जप्त करण्यात आले आहे.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर देशभरात लॉकडाऊन आहे. या लॉकडाऊन दरम्यान वाची भागात जवानांना तैनात करण्यात आले होते. त्यांच्यावर हे दहशतवादी हल्ला करणार होते. दरम्यान, पोलिसांकडून या दहशतवाद्यांविरोधात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरु आहे. गेल्या काही दिवसांपासून जम्मू-काश्मीरच्या सीमा भागात दहशतवाद्यांच्या कारवाया सुरु आहेत. जवानांकडून त्यांना चोख प्रत्युत्तर दिले जात आहे.