नवी दिल्ली : कर्नाटकात विधानसभा निवडणुकीपूर्वी भाजपला मोठा झटका बसला आहे. कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री जगदीश शेट्टार यांनी तडकाफडकी राजीनाम्यानंतर काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे. त्यामुळे आगामी निवडणुकीची गणितं पूर्णपणे बदलणार असल्याच्या चर्चांना उधाण आले आहे.
काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे, कर्नाटक भाजपा अध्यक्ष अध्यक्ष डी. के. शिवकुमार आणि काँग्रेस नेते रणदीप सुरजेवाला, सिद्दरामया यांच्या उपस्थितीत आज बंगळुरूत जगदीश शेट्टार पक्षप्रवेश झाला. तर “मी मनापासून काँग्रेसमध्ये प्रवेश करत आहे. काँग्रेस नेते डी. के. शिवकुमार, सिद्दरामया, रणदीप सुरजेवाला आणि एम. बी. पाटील यांनी माझ्याशी संपर्क केला होता. मी कोणताही विचार न करता येथे आलो आहे”, अशी प्रतिक्रिया यावेळी जगदीश शेट्टार यांनी दिली आहे.
कर्नाटकात निवडणुका जाहीर होताच विविध पक्षांनी उमेदवारांच्या नावांच्या याद्या जाहीर केल्या. गेल्या आठवड्यात भाजपाकडूनही उमेदवारांच्या नावांच्या तीन याद्या जाहीर करण्यात आल्या. पहिल्या यादीत नाव न आल्याने माजी उपमुख्यमंत्री लक्ष्मण सावदी यांनी नाराज होऊन भाजपाला रामराम ठोकला आणि काँग्रेसचा हात हाती घेतला. त्यापाठोपाठ जाहीर झालेल्या याद्यांमध्ये माजी मुख्यमंत्री जगदीश शेट्टर यांचं नाव न आल्याने त्यांनीही भाजपाला सोडचिठ्ठी दिली. आता त्यांनीही काँग्रेसला साथ देण्याचे ठरवले त्यानुसार आज बंगळुरूत त्यांचा जाहीररित्या पक्षप्रवेश झाला.
#WATCH | Former Karnataka CM Jagadish Shettar joins Congress, in the presence of party president Mallikarjun Kharge, KPCC president DK Shivakumar & Congress leaders Randeep Surjewala, Siddaramaiah at the party office in Bengaluru.
Jagadish Shettar resigned from BJP yesterday. pic.twitter.com/vxqVuKKPs1
— ANI (@ANI) April 17, 2023
गेल्या सहा टर्मपासून हुबळी-धारवाड मध्य मतदारसंघाचे आमदार असलेले जगदीश शेट्टार यांना आगामी निवडणुकीसाठी भाजपाने संधी दिली नाही. त्यामुळे नाराज शेट्टर यांनी मुख्यमंत्री बसवराज बोम्मई आणि केंद्रीय मंत्री प्रल्हाद जोशी यांच्याशी चर्चाही केली होती. परंतु, ही चर्चा अपयशी ठरल्याने त्यांनी काँग्रेसमध्ये जाण्याचा निर्णय घेतला असल्याचं सांगितलं जात आहे.
दरम्यान, “जगदीश शेट्टार यांनी कोणतीही मागणी केलेली नाही. आम्ही त्यांना कोणतेही ऑफर दिलेले नाही. पक्षाचा आणि पक्षनेतृत्त्वाचा आदेश त्यांना पाळावा लागेल. आम्हाला देशाला एकसंध ठेवायचं आहे आणि काँग्रेसच असं करू शकेल”, अशी प्रतिक्रिया कर्नाटक काँग्रेस अध्यक्ष डी.के. शिवाकुमार यांनी दिली.