बीजिंग – युक्रेनचा तिढा सोडवण्यासाठी विधायक भूमिका बजावण्याची चीनचे अध्यक्ष शी जिनपिंग यांनी तयारी दर्शवली आहे. चीनमधील सरकारी वृत्तवाहिनीने याबाबतचे वृत्त दिले आहे.
रशियाचे अध्यक्ष ब्लादिमिर पुतीन यांच्याबरोबर फोनवरून चर्चा करताना जिनपिंग यांनी युक्रेनचा तिढा योग्य मार्गाने सोडवण्यासाठी सर्व संबंधितांनी जबाबदारीने भूमिका घेण्याची गरज असल्याचे आवाहन केले. त,ेच या प्रकरणी चीन आपली विधायक भूमिका यापुढेही कायम ठेवणार असल्याचेही त्यांनी सांगितले.
युक्रेनसंदर्भात चीनने वास्तव आणि ऐतिहासिक संदर्भ लक्षात घेऊन स्वतंत्र भूमिका घेतली आहे. जागतिक पातळीवर शांतता राखण्यासाठी चीनने सक्रिय योगदान दिले आहे. त्याचप्रमाणे जागतिक पातळीवर आर्थिक व्यवस्था कायम राखण्यातही चीनने योगदान दिल्याचे जिनपिंग म्हणाले.
मात्र युक्रेनचा तिढा सोडवण्यासाठी चीनने कशाप्रकारे मध्यस्थी करायचे ठरवले आहे, हे निश्चित होऊ शकलेले नाही. युक्रेन संदर्भात चीनने यापूर्वी अशी विधायक भूमिका घेण्यास टाळाटाळ केली होती. रशियाने युक्रेनवर केलेल्या हल्ल्याची निंदा चीनने केली नव्हती.