नवी दिल्ली – रशियाचे अध्यक्ष ब्लादिमिर पुतीन यांनी पुन्हा एकदा अणुयुद्धाची धमकी दिली आहे. आपल्या राज्यतत्व, सार्वभौमत्वाला किंवा स्वातंत्र्याला धोका निर्माण झाल्यास रशिया अण्वस्त्रांचा वापर करण्यास तयार आहे, असे त्यांनी म्हटले आहे. आपल्याला अण्वस्त्रांचा वापर करणे भाग पडू शकते, अशी कोणतीही कृती अमेरिकेकडून केली जाणार नाही, अशी आशाही त्यांनी व्यक्त केली आहे. रशियाच्या अध्यक्षपदाची निवडणूक पुढच्या आठवड्यात होते आहे. अध्यक्षपदाच्या निवडणुकीमध्ये त्यांचा विजय निश्चित मानला जातो आहे. यामुळे त्यांना रशियाचे अध्यक्ष म्हणून आणखीन ६ वर्षांचा कार्यकाळ मिळू शकतो. त्यापूर्वी पाश्चात्य देशांना दिलेली ही त्यांची दुसरी उघड धमकी आहे.
रशियाच्या सरकारी वृत्तवाहिनीवरून दिलेल्या मुलाखतीमध्ये त्यांनी ही धमकी दिली आहे. अमेरिकेचे अध्यक्ष बायडेन हे ज्येष्ठ राजकारणी आहेत. संघर्ष चिघळण्याचे परिणाम काय होऊ शकतात, याची त्यांना कल्पना आहे. जग अणुयुद्धाच्या दिशेने प्रवास करत असल्याची बायडेन यांना कल्पना नाही, असेही पुतीन म्हणाले.
रशियाची अण्वस्त्रे सज्ज आहेत. रशिया लष्करी-तांत्रिक दृष्टीने सज्ज आहे, यावरही पुतीन यांनी जोर दिला. रशियाच्या अस्तित्वाला, सार्वभौमत्वाला आणि स्वातंत्र्यालाच धोका उत्पन्न झाला, तर रशिया अण्वस्त्रांचा वापर करू शकतो, असे ते म्हणाले.
रशियाने फेब्रुवारी २०२२ मध्ये युक्रेनवर आक्रमण केले, तेंव्हापासून पुतीन यांनी वारंवार अण्वस्त्रांचा वापर करण्याची धमकी दिली आहे. सर्वात अलिकडे गेल्या महिन्यात देशवासियांना उद्देशून केलेल्या संबोधनामध्ये त्यांनी पाश्चात्य देशांना ही धमकी दिली होती. युक्रेनविरुद्धच्या संघर्षामध्ये पाश्चात्य देश जितके जास्त सहभागी होतील, तितकी अणुयुद्धाची शक्यता वाढेल, असे ते म्हणाले होते.
युक्रेनविरुद्धात अण्वस्त्रे वापरण्याचा कधी विचार केला का, असे विचारले असता, त्याची गरज भासली नाही, असे पुतीन म्हणाले होते. रशिया युक्रेनमधील आपला कार्यभार नक्की साध्य करेल असे सांगताना चर्चेसाठी आपण दरवाजे उघडे ठेवले असल्याचेही त्यांनी सांगितले. रशिया जे मिळवेल ते आपल्या ताब्यात ठेवेल असे सांगतानाच रशियाच्या स्वातंत्र्याला बाधा येणार नाही, अशी पाश्चात्यांकडून ठाम हमीची अपेक्षाही पुतीन यांनी केली.
दरम्यान युक्रेनने रशियामध्ये आपले ड्रोन हल्ले वाढवले आहेत. रशियाकडूनही ड्रोन हल्ल्यांनीच प्रत्युत्तर दिले जाऊ लागले आहे.