मॉस्को – जर कोणी युक्रेनला लष्करी मदत केली तर अणुयुध्द सुरू होऊ शकते अशा शब्दांत रशियाकडून नाटो देशांना धमकावण्यात आले आहे. रशियाचे अध्यक्ष ब्लादीमिर पुतीन यांनीच ही धमकी दिली असून गेल्या काही तासांत नाटोमध्ये झालेल्या घडामोडीच्या पाश्र्वभूमीवर याकडे गांभीर्याने पाहिले जाते आहे.
अर्थात पुतीन यांनी पहिल्यांदाच अशी धमकी दिलेली नाही. यापूर्वीही वेळोवेळी पश्चिमेकडच्या देशांना त्यांच्याकडून असे इशारे देण्यात आले आहेत. रशिया आणि युक्रेन यांच्यातील युध्दाला आता दोन वर्ष पूर्ण झाली आहेत. युक्रेनच्या काही भूभागावर रशियाने कब्जाही केला आहे.
मात्र तणाव अद्याप कायम आहे. रशियाची आक्रमकताही कमी झालेली नाही आणि युक्रेनही मागे हटण्यास तयार नाही. येणाऱ्या दिवसांत हे युध्द आणखी भीषण स्वरूप प्राप्त करेल अशी भीतीही व्यक्त केली जाते आहे. त्यामुळेच पुतीन यांनी धमकावणीचा सूर लावलेला दिसतो आहे.
आमच्या प्रकरणांत कोणीही हस्तक्षेप करू शकत नाही. रशियावर हल्ला करण्याचा जो कोणी प्रयत्न करेल त्याला दुसऱ्या महायुध्दापेक्षाही भयंकर परिणामांचा सामना करण्यासाठी तयार राहावे लागेल. विशेष लष्करी कारवाई आता व्हायला हवी अशी बहुतांश रशियन नागरिकांची भावना आणि तसे मानणे असल्याचे पुतीन यांनी म्हटले आहे.