अहमदाबाद : 2003 मधील एका जिहादी कटातील फरारी आरोपीला सोळा वर्षांनंतर अटक करण्यात पोलिसांना यश आले आहे. युसुफ अब्दुल वहाब शेख असे या 50 वर्षीय आरोपीचे नाव असून तो आज सौदी अरेबियांतून अहमदाबाद एअरपोर्टवर आला असताना त्याला अटक करण्यात आली.
गुजरातमध्ये झालेल्या दंगलीचा बदला घेण्यासाठी ज्या जिहादींनी हिंसाचार माजवण्याचा कट रचला होता त्यांना आर्थिक मदत मिळवून देण्याचे काम त्याने केले होते. त्याच्यावर पोलिसांनी गुन्हा दाखल करताच त्याने भारतात येण्याचे टाळले होते. तो 1999 पासून सौदी अरेबीयात राहात होता. सन 2002 मध्ये त्याने गुजरातला शेवटची भेट दिली होती. तो आपल्या मुलांसह आपल्या गुजरात मध्ये राहणाऱ्या दुसऱ्या पत्नीला भेटण्यासाठी आला असताना पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले. गुजरात मधील जिहादी गटांसाठी तो सौदीत निधी गोळा करीत असे व त्याने आत्ता पर्यंत तीन वेळा आपल्या मध्यस्थांमार्फत असा निधी पाठवला होता. हरेन पंड्या यांच्या हत्या प्रकरणातील मास्टरमाईंड मुफ्ती सुफियान याला तो निधी पुरवण्याचे काम करीत होता अशी पोलिस रेकॉर्डवरील नोंद आहे.