शहाजहानपुर : भाजपचे माजी केंद्रीय मंत्री आणि बलात्काराचा आरोप करण्यात आलेले नेते चिन्मयानंद यांना आज येथील किंग जॉर्ज मेडिकल युनिव्हर्सिटी रूग्णालयात दाखल करण्यात आले. त्यांना सध्या चौदा दिवसांच्या न्यायालयीन कोठडीत ठेवण्यात आले आहे. तथापी त्यांना तुरूंगात अस्वस्थ वाटू लागल्याने त्यांना डॉक्टरांच्या सल्ल्यानंतर ऍजिओप्लास्टीसाठी रूग्णालयात हलवण्यात आले आहे.
चिन्मयानंद यांनीच कोर्टात अर्ज करून रूग्णालयात दाखल करण्याची अनुमती मागितली होती अशी माहिती कारागृहाचे अधिक्षक राकेशकुमार यांनी दिली. त्यांच्या प्रकृतीविषयी त्यांचे एक सहकारी आणि भाजपचे माजी आमदार जयेश प्रकाश यांनीहीं चिंता व्यक्त करीत त्यांना रूग्णालयातील उपचाराची गरज असल्याचे म्हटले होते. चिन्मयानंद यांनी आपल्या अधिकारपदाचा वापर करून आपला वर्षभर लैंगिक छळ केल्याचा आरोप एका महाविद्यालयीन युवतीने केला होता. त्याच प्रकरणात ते सध्या अटकेत आहेत.