बेल्हे – स्वतःच्या अंगावर धारण केलेले अलंकार, दागिने हेच खरे स्रियांचे अस्त्र आहे. त्याचाच वापर शस्त्र म्हणून करता येऊ शकतो. याबाबत इस्रोचे तंत्रज्ञ धनेश बोरा यांनी विस्तृत माहिती दिली.
समर्थ रूरल एज्युकेशनल इन्स्टिट्यूट संचलित समर्थ शैक्षणिक संकुल बेल्हे (ता. जुन्नर) येथे नुकताच स्वयंसिद्धा हा एक अनोखा उपक्रम आयोजित केला होता. यावेळी संस्थेचे अध्यक्ष वसंत शेळके, उपाध्यक्ष माऊली शेळके, सचिव विवेक शेळके, विश्वस्त वल्लभ शेळके, जुन्नर तालुका विज्ञान अध्यापक संघाचे अध्यक्ष प्रा. रतिलाल बाबेल, प्राचार्य डॉ.लक्ष्मण घोलप, प्राचार्य राजीव सावंत आदी उपस्थित होते.
अनेक अलंकार आणि दागिन्यांनी नटलेल्या महिला भगिनी आपल्याला लग्न, समारंभ, यात्रा, उत्सव इ. ठिकाणी हमखास पाहायला मिळतात. चोरी, बदलाची भावना या कारणाने महिलांवर अत्याचार होतो. त्यांना असुरक्षिततेची जाणीव होते. हिच असुरक्षितता घालवण्यासाठी शास्त्रज्ञ म्हणून इस्रोचे तंत्रज्ञ धनेश बोरा यांनी एक प्रभावशाली व अनोखा असा तोडगा शोधून काढला आहे. समर्थ शैक्षणिक संकुल बेल्हे येथील 1 हजार 500 विद्यार्थिनींना स्वयंसिद्धा या एका अनोख्या उपक्रमांतर्गत याच अनुषंगाने मार्गदर्शन करण्यासाठी ते उपस्थित होते.
“वुमन प्रोटेक्शन इन वन डॉलर’ असे सांगत धनेश बोरा म्हणाले की, नियोजन आणि प्रयोजन आधीच केले पाहिजे. ध्येय धोरण आधीच ठरविली पाहिजेत. जगाच्या बाजारात काहीतरी नाविन्यपूर्ण दिल्याशिवाय आणि केल्याशिवाय आपली किंमत कळत नाही. कौशल्य आत्मसात करा, नवनिर्मितीचा ध्यास घ्या, असे बोरा यावेळी म्हणाले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. प्रदीप गाडेकर यांनी तर डॉ. लक्ष्मण घोलप यांनी आभार मानले.
असे आहेत दागिने
हैद्राबाद, इचलकरंजी, हिंगणघाट या ठिकाणी घडलेल्या घृणास्पद घटनांनी धनेश बोरा शांनी महिलांसाठी अशा प्रकारचे दागिने तयार करण्याचे ठरविले. या दागिन्यांमध्ये एक छोट्या बटणाच्या साहाय्याने विशिष्ट प्रकारचे जैविक रसायन सोडले जाते. ज्याचा वापर समोरच्या चोरांवर शिताफीने करून ते चोर पुढील 5 ते 10 तास बेशुद्ध होतात. हे दागिने अतिशय सुबक व कलाकुसरीचा वापर करून तयार केल्याने इतर दागिन्यांपेक्षा वेगळे वाटत नाहीत. मुली, महिला हे दागिने माझ्या परवानगीने घरीही अवघ्या 72 रुपयांमध्ये असे दागिने बनवू शकतात.