मुंबई : माण-खटावचे आमदार जयकुमार गोरे यांना पुन्हा एकदा पुण्याला उपचारासाठी हलवण्यात आले आहे. गेल्या दोन दिवसात दगदग वाढल्याने जयकुमार गोरे यांच्या छातीतील वेदना मोठ्या प्रमाणावर वाढल्या आहेत. रुबी हॉल क्लिनिकच्या डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार जयकुमार गोरे यांना रात्री पुन्हा पुण्याला हलवण्यात आले असल्याचे सांगण्यात येत आहे.
फलटण येथे काही दिवसांपूर्वी भीषण अपघातात जयकुमार गोरे जखमी झाले होते. त्यांच्या पाय आणि बरगड्यांना इजा झाली होती. 5 जानेवारी त्यांना एअर अॅम्ब्युलन्सने बोराटवाडी येथे आणण्यात आले होते. या प्रवासादरम्यान दगदग झाल्याने त्यांच्या छातीत तीव्र वेदना होऊ लागल्या. त्यानंतर रुबी हॉल क्लिनिकच्या डॉक्टरांच्या सल्ल्याने त्यांच्यावर स्थानिक डॉक्टरांनी उपचार केले होते. मात्र त्यानंतर त्यांना तातडीने पुढील उपचारासाठी पुण्याला हलवण्यात आले आहे.
5 जानेवारीला पुण्यातील रुबी हॉल क्लिनिकमधून डिस्चार्ज देण्यात आला होता. त्यानंतर ते हेलिकॉप्टरने त्यांच्या गावी रवाना झाले होते. त्रास वाढल्याने परत पुण्यात उपचारासाठी आणण्यात आलं आहे. नागपूरमध्ये हिवाळी अधिवेशन सुरु असताना आमदार जयकुमार गोरे हे रात्री उशिरा नागपूरहून विमानाने पुण्यात आले होते आणि पुण्यातून त्यांच्या गावी जात असताना रात्री साडेतीन वाजता फलटणजवळ त्यांच्या गाडीला अपघात झाला होता. पुलाचा कठडा तोडून त्यांची गाडी तीस फूट खोल खाली कोसळली होती.
दरम्यान, डिस्चार्ज मिळाल्यानंतर,”रुबी हॉलमध्ये दाखल असल्याच्या या दिवसात मला वॉर्ड बॉय, नर्स, केअर टेकर, डॉक्टर्स यांनी त्यांच्या कुटुंबातील सदस्याप्रमाणे माझी काळजी घेतली आणि या दृष्टीकोनामुळेच माझी तब्येत अपेक्षेपेक्षा खूप लवकर ठीक झाली. माझी अत्यंत काळजी घेतल्याबद्दल डॉ. पूर्वेझ ग्रांट, डॉ. झिरपे आणि न्यूरो ट्रॉमा युनिट टीमचा आभारी आहे, असे म्हणत आमदार गोरेंनी टीमचे आभार मानले होते.