ठोसेघर – परळी खोऱ्यातील सांडवली ग्रुप ग्रामपंचायतीतील वारसवाडीचे सुपुत्र, जवान विजय रामचंद्र कोकरे यांना जम्मू काश्मिरमधील श्रीनगर येथे सेवा बजावत असताना, हृदयविकाराच्या तीव्र धक्क्याने वीरमरण आले. या घटनेची माहिती मिळताच नातेवाईकांसह परळी खोऱ्यातून हळहळ व्यक्त केली जात आहे.
विजय कोकरे हे 21 मार्च 2017 रोजी सैन्य दलात भरती झाले होते. या दरम्यान त्यांनी देशाच्या विविध भागात आपली सेवा बजावली. सध्या ते 25 आर आर मद्रास या युनिटमध्ये सेवा बजावत होते. सेवा बजावत असताना दि. 20 रोजी सकाळी अकरा वाजणाच्या सुमारास त्यांना अस्वस्थ वाटू लागल्याने उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले. उपचारादरम्यान त्यांना हृदयविकाराच्या तीव्र धक्क्याने मृत झाल्याचे घोषित करण्यात आले.
परळी खोऱ्यातील दुर्गम भागातील वारसवाडी या छोट्याशा गावातील रामचंद्र कोकरे हे उदरनिर्वाहाच्या निमित्ताने मुंबईत वास्तव्यास होते. दुसऱ्याच्या वाहनावर चालक म्हणून कष्टाने काम करीत त्यांनी विजयला शिक्षण देऊन सैन्यदलात भरती केले होते. दरम्यान जवान विजय कोकरे यांचे पार्थिव शुक्रवारी रात्री किंवा शनिवारी सकाळपर्यंत त्यांच्या मुंबईच्या राहत्या घरी आणले जाणार असून त्यांच्या पार्थिवावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार केले जाणार आहेत. त्यांच्या पश्चात आई, बहिण असा परिवार आहे.