Boat capsize । जम्मू-काश्मीरमधील श्रीनगरमधील झेलम नदीत आज सकाळी बोट उलटल्याची धक्कादायक घटना घडलीय. या झालेल्या अपघातात चार जणांचा मृत्यू झाला असल्याची माहिती समोर येतीय. याठिकाणच्या बटवारा परिसरात ही दुर्घटना झालीय. अजून बचावकार्य सुरु आहे.
अनेक विद्यार्थी आणि स्थानिकांना घेऊन गंडबाल ते बटवारा, श्रीनगरला जाणारी एक बोट आज पहाटे मध्य काश्मीरमधील श्रीनगर जिल्ह्यातील बटवारा भागाजवळ झेलम नदीत उलटली. 12 हून अधिक जणांना घेऊन ही बोट गांदरबलहून बटवारा येथे जात होती. त्यात काही मुलेही होती.
SDRF च्या बचाव कार्यात चार जणांचे मृतदेह बाहेर काढण्यात आले. तर तीन जखमींना नदीतून बाहेर काढण्यात आले. तिघांनाही श्रीनगरच्या एसएमएचएस रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. उर्वरित लोकांचा शोध सुरू आहे.
पुरामुळे बोट उलटली Boat capsize ।
स्थानिक बोट मालक दररोज लोकांना गांदरबाल येथून बटवारा येथे घेऊन जातात. आज उलटलेल्या बोटीत शाळकरी मुले, त्यांचे पालक आणि मजूर यांचा समावेश होता. हे लोक रोज अशाच बोटीने झेलम नदी पार करायचे. गेल्या 48 तासांत झालेल्या मुसळधार पावसामुळे झेलमच्या पाण्याची पातळी वाढली होती, त्यामुळे बोट उलटली.
अनेक दिवसांपासून पाऊस आणि बर्फवृष्टी सुरू
जम्मू-काश्मीरमध्ये पाऊस आणि बर्फवृष्टी सुरूच आहे. त्यामुळेच नद्यांच्या पाणी पातळीत दिवसेंदिवस वाढ होताना दिसत आहे. पूंछ-राजौरी जिल्ह्यांना थेट काश्मीरशी जोडणाऱ्या मुघल रोडवर पुन्हा बर्फवृष्टी झाली. त्यामुळे वाहतूक ठप्प झाली होती. वरच्या भागात बर्फवृष्टी होत आहे, तर सखल भागात पाऊस सुरू आहे. त्यामुळे नदीला पूर आला आहे. येत्या काही दिवसांत जम्मू-काश्मीरमध्येही अशीच स्थिती राहणार असल्याचे हवामान खात्याने म्हटले आहे.
पुन्हा अलर्ट जारी Boat capsize ।
या काळात उत्तर भारतात वेस्टर्न डिस्टर्बन्स सक्रिय असतो. आजही हवामान खात्याने वरच्या भागात हिमवृष्टीचा आणि खालच्या भागात मुसळधार पावसाचा इशारा दिला आहे. 20 एप्रिलपासून खोऱ्यात पुन्हा हवामानात बदल होणार आहे. त्यामुळे स्थानिक नागरिक आणि पर्यटकांच्या अडचणीत आणखी वाढ होण्याची शक्यता आहे.