सातारा : जावळी पंचायत समितीचे विद्यमान उपसभापती सौरभ शिंदे यांना जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे. याप्रकरणी कुडाळ दूरक्षेत्रात दोघांवर अदखलपात्र गुन्हा दाखल झाला आहे.
किसनवीर कारखान्याचे संचालक चंद्रसेन शिंदे व कुडाळचे सरपंच विरेंद्र शिंदे अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत. कुडाळ येथे अपुलकी पेट्रोल पंपासमोर उप सभापती सौरभ शिंदे यांची जमीन आहे. यातील एक प्लाॅट त्यांनी रामचंद्र पवार (रा. शेते, ता. जावळी) यांना विकला आहे.
त्या प्लाॅटमध्ये किसनवीर कारखान्याची ऊसतोडणी करणारी टोळी वास्तव्यास आहे. ही टोळी त्याठिकाणी वास्तव्यास असल्याने बाकीचे प्लाॅट विक्री करताना अडचण येत असल्याने ती टोळी हटवण्याबाबत सौरभ शिंदे यांनी पवार यांना विनंती केली होती. त्यानंतर ती टोळी हटविण्याच्या कारणावरून शुक्रवारी वाद झाला. यावेळी सौरभ शिंदे यांना जीवे मारण्याची धमकी देण्यात आल्याचे शिंदे यांनी दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे.