टोकियो – इंडोनेशियन खुल्या स्पर्धेत उपविजेतेपदावर समाधान मानणारी भारताची पी.व्ही.सिंधू हिने जपान खुल्या बॅडमिंटन स्पर्धेत विजेतेपद मिळविण्याच्या निर्धाराने खेळणार आहे. या स्पर्धेस येथे आजपासून प्रारंभ होत आहे. या स्पर्धेत भारताची सायना नेहवालही सहभागी झाली आहे.
जाकार्ता येथील अंतिम लढतीत सिंधूला अकाने यामागुचीकडून सरळ दोन गेम्समध्ये पराभव पत्करावा लागला होता. येथील पहिल्या सामन्यात चौथ्या मानांकित सिंधूला चीनच्या हान युई हिच्याशी खेळावे लागणार आहे. ती म्हणाली की, ‘यामागुचीविरूद्ध मला परतीच्या फटक्यांवर नियंत्रण ठेवता आले नाही. त्याचप्रमाणे प्रतिस्पर्धी खेळाडूने कॉर्नरजवळ केलेल्या प्लेसिंगबाबत माझा अंदाज चुकला. या सामन्यात झालेल्या चुकांची पुनरावृत्ती होणार नाही याची मी काळजी घेणार आहे’.
सायना हिला येथे आठवे मानांकन मिळाले असून पहिल्या फेरीत तिच्यापुढे थायलंडच्या बुसानन ओंग्बामृंगफन हिच्याशी गाठ पडणार आहे. आतापर्यंत सायनाने तिच्याविरूद्ध तीन वेळा विजय मिळविला आहे.
पुरूषांच्या एकेरीत भारताच्या एच.एस.प्रणोय याची त्याचाच सहकारी किदम्बी श्रीकांत याच्याशीच झुंज द्यावी लागणार आहे. बी.साईप्रणित याच्यापुढे जपानच्या केन्ता निशिमोतो याचे आव्हान आहे. समीर वर्माचा डेन्मार्कच्या अँडर्स अन्तोन्सन याच्याबरोबर सामना होणार आहे. दुहेरीत मनु अत्री व बी.सुमेध रेड्डी यांची मलेशियाच्या गोहस्झे फेई व नूराझुद्दीन यांच्याशी लढत होईल.