मुंबई – बॉलिवूड अभिनेते अनिल कपूर आणि अभिनेत्री माधुरी दीक्षित यांचा 1988 मध्ये रिलीज झालेल्या बहुप्रसिद्ध ‘तेजाब’ या चित्रपटाच्या रिमेकची आतापर्यंत बरीच चर्चा झाली आहे. आता याबाबत एक नवीन अपडेट समोर आली आहे. ‘कबीर सिंग’ चित्रपटाचे निर्माते मुराद खेतानी यांनी 2021 मध्ये ‘तेजाब’चे हक्क विकत घेतले आहे. दरम्यान, आता ‘तेजाब’च्या रिमेकमध्ये अभिनेता रणवीर सिंग आणि अभिनेत्री जान्हवी कपूर मुख्य भूमिका साकारणार असल्याचं बोललं जात आहे. एका प्रसिद्ध वृत्तवाहिनीने याबद्दल माहिती दिली आहे. मात्र, रणवीर आणि जान्हवी एकत्र आल्यास ही जोडी पहिल्यांदाच रुपेरी पडद्यावर सोबत दिसणार आहे.
या चित्रपटाच्या रिमेकमध्ये अभिनेत्री श्रद्धा कपूर आणि अभिनेता कार्तिक आर्यन यांना कास्ट करण्याचा विचारही निर्मात्यांनी केला होता. परंतु नंतर हा विचार वगळण्यात आला. मिळलेल्या माहितीनुसार, निर्माते आता मुख्य भूमिकेसाठी रणवीर सिंग आणि जान्हवी कपूर यांच्याशी चर्चा करत आहेत.
मात्र, याबद्दल अद्याप कोणतेही अधिकृत वक्तव्य समोर आलेले नाही. 2021 मध्ये निर्माता मुरादने ‘तेजाब’ चित्रपटाच्या रिमेकचे हक्क विकत घेतले. एका मुलाखतीतही त्यांनी याबद्दल सांगितले. मुराद म्हणाले की, ‘तेजाब’ हा आयकॉनिक चित्रपट असून त्याच्या रिमेकची कथा आधुनिक काळानुसार असेल. असं ते म्हणाले होते.
दरम्यान, 1988 मध्ये रिलीज झालेल्या ‘तेजाब’ या चित्रपटातून माधुरी दीक्षितला पहिल्यांदा बॉक्स ऑफिसवर यश मिळाले. तिचे ‘एक दो तीन’ हे गाणे चाहत्यांच्या आणि सिनेप्रेमींच्या हृदयात अशा प्रकारे स्थिरावले की ते आजही स्मरणात आहे. या चित्रपटात चंकी पांडे, अनुपम खेर, सुरेश ओबेरॉय आणि अन्नू कपूर या कलाकारांनी महत्त्वपूर्ण भूमिका साकारल्या होत्या.