नवी दिल्ली : उत्तर प्रदेशातील मुझफ्फरनगर येथील एका शाळेत शिक्षिकेने वर्गातील एका मुस्लीम विद्यार्थ्याला सर्वांसमोर मारहाण केल्याच्या घटनेचा व्हिडीओ समोर आल्यानंतर एकच खळबळ उडाली होती. हे प्रकरण ताजे असताना आता जम्मू-काश्मीरमधील कठुआ जिल्ह्यातील सरकारी शाळेत शिक्षकाने विद्यार्थ्याला मारहाण केल्याची घटना समोर आली आहे.
संबंधित विद्यार्थ्याने वर्गातील फलकावर ‘जय श्री राम’ लिहिल्याने ही मारहाण झाल्याचे बोलले जात आहे. याप्रकरणी आरोपी शिक्षकासह शाळेच्या मुख्याध्यापकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी शनिवारी आरोपी शिक्षकाला अटक केली आहे. तर मुख्याध्यापक फरार असल्याची माहिती पोलिसांनी दिली.
एका इंग्रजी वर्तमानपत्राने याविषयी माहिती दिली आहे. वर्तमानपत्राच्या वृत्तानुसार, पोलिसांनी शिक्षक आणि मुख्याध्यापकावर गुन्हा दाखल केला आहे. या घटनेचा पुढील तपास पोलीस करत आहेत. कठुआ येथील या प्रकारानंतर उपायुक्तांनी या घटनेच्या चौकशीसाठी तीन सदस्यीय समिती स्थापन केली आहे.
याबाबतची माहिती उपायुक्तांनी स्वत: अधिसूचना जारी करत दिली. या समितीमध्ये बानीचे उपविभागीय दंडाधिकारी, कठुआचे उप शिक्षणाधिकारी आणि खरोटे येथील सरकारी उच्च माध्यमिक शाळेचे मुख्याध्यापक यांचा समावेश आहे.