पुणे – महाराष्ट्राचे कुलदैवत तथा खंडेरायाची राजधानी असलेल्या जेजुरीच्या खंडोबा मंदिराबाबत महत्त्वपूर्ण माहिती समोर आली आहे. उद्यापासून (28 ऑगस्ट) खंडोबा मंदिराचा गाभारा भाविकांसाठी दीड महिने बंद ठेवण्यात येणार आहे. खंडोबा मंदिरावर असलेल्या मुख्य स्वयंभू लिंगाचा आणि घोड्याचा गाभारा दुरुस्तीच्या कामामुळे बंद ठेवण्यात येणार आहे. त्यामुळे 28 ऑगस्टपासून 5 ऑक्टोबरपर्यंत मंदिराचा गाभारा हा भाविकांसाठी बंदच राहणार आहे. भाविकांना केवळ कासवापासून देवाचे दर्शन घेता येणार आहे.
जेजुरीचा ऐतिहासिक खंडोबा गड जतन करण्यासाठी पुरातत्व खात्याच्या मार्गदर्शनाखाली दुरुस्ती आणि उपाययोजना केल्या जाणार आहेत. यासाठी सुमारे 107 कोटी रुपयांचा विकास आराखडा मंजूर झाला आहे. त्यानुसार येथे काम केले जाणार आहे. दरम्यान मुख्य गाभाऱ्याचे काम सुरु असताना गडावर येणाऱ्या भाविकांच्या अभिषेक महापूजा या पंचलिंग भुलेश्वर मंदिरात करण्यात येणार आहेत.
दरम्यान, खंडोबा गडाच्या गाभाऱ्याचे दुरुस्तीचे काम हाती घेतले असले तरी भाविकांना गडावर येऊन आपले कुलधर्म कुलाचार करण्यात कोणतीही अडचण येणार नाही. खंडोबाची त्रिकाळ पूजा नेहमीप्रमाणे सुरु राहणार आहे. मात्र इतर कोणालाही गाभाऱ्यामध्ये दर्शनासाठी जाता येणार नाही, असे देवस्थानच्या विश्वस्त मंडळाने सांगितले आहे.