अंबाला : पाकिस्तानस्थित जैश-ए-महंमद या दहशतवादी संघटनेच्या सदस्याला हरियाणामध्ये अटक करण्यात आली. तो जम्मू-काश्मीरमधून सफरचंद घेऊन दिल्लीला निघालेल्या ट्रकमधून प्रवास करत होता. जम्मू-काश्मीर लष्करी गुप्तचर आणि पंजाब पोलिसांनी शुक्रवारी सायंकाळी हरियाणा पोलिसांशी संपर्क साधला. जम्मू-काश्मीरचा रहिवासी असणारा जैशचा दहशतवादी सफरचंदांची वाहतूक करणाऱ्या ट्रकमधून अंबालातून जात असल्याची माहिती त्यांना देण्यात आली. त्याआधारे हरियाणा पोलिसांनी तातडीने हालचाली करत अंबाला कॅन्टोन्मेंट भागात राष्ट्रीय महामार्गावर नाकाबंदी केली. त्यानंतर एक ट्रक अडवण्यात आला.
त्या ट्रकमधील एक व्यक्ती ओळखीचा पुरावा देऊ शकली नाही. त्यावरून त्या व्यक्तीला पकडण्यात आले. ती व्यक्ती म्हणजे जैशचा दहशतवादी मोहम्मद इस्माईल असल्याचे समजते. त्याला नंतर जम्मू-काश्मीर पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आले. पंजाबमधून त्याचा पाठलाग स्थानिक पोलीस आणि लष्करी गुप्तचर आधीपासूनच करत होते. तो निसटण्याच्या शक्यतेने हरियाणा पोलिसांशी संपर्क साधण्यात आला होता. मोहम्मद नेमका कुठे आणि कशासाठी निघाला होता, याची माहिती तातडीने मिळू शकली नाही.