नवी दिल्ली – कोरोना विषाणूचा सगळ्यात आधी केंद्र बिंदू चीन मधील वुहान शहर ठरले होते. चीनच्या वुहान या शहरात मागील वर्षी कोरोनाचा पहिला रुग्ण आढळला होता. मंगळवारी या घटनेला एक वर्ष पूर्ण झाले. चीननंतर बघता बघता या विषाणूने संपूर्ण जगभरात आपले पाय पसरण्यास सुरवात केली.
कोरोना मुळे अनेक नागरिकांना आपला जीव गमवावा लागला. अद्यापही लोकांच्या मनात कोरोनाची भीती आहे. एक वर्ष झालं तरी जगभरातील सर्व तज्ज्ञ, डॉक्टर कोरोनाची लस शोधत आहे. अश्यातच आता आणखी एक नवीन विषाणू समोर आला आहे. हा विषाणू देखील कोरोना सारखाच आहे. अमेरिकेच्या रोग नियंत्रण केंद्रानेही याची पुष्टी केली आहे.
बोलिव्हियामध्ये या विषाणूचे संसर्ग होण्याच्या घटना समोर आल्या आहे. हा एक प्रकारचा ताप असून यामुळे मेंदूत रक्तस्राव होऊ शकतो. या विषाणूची लक्षणं इबोलासारखी आहे. वैज्ञानिकांच्या म्हणण्यानुसार, या विषाणूचे नाव “चॅप्रे व्हायरस” आहे. या व्हायरसची प्रकरणं 2004 मध्ये बोलिव्हियाच्या चॅप्रे भागात दिसून आली. लाइव्ह सायन्सच्या अहवालानुसार, सीडीसीने म्हटले आहे की 2019 मध्ये या संसर्गामुळे ग्रस्त पाच पैकी दोन लोकांचा मृत्यू झाला.