UAE Hindu Temple : संयुक्त अरब अमिराती (UAE) म्हणजेच दुबईमधील पहिले हिंदू मंदिर फेब्रुवारी महिन्यात भाविकांसाठी खुले होणार आहे. तर पंतप्रधान नरेंद्र मोदी या मंदिराच्या उद्घाटन सोहळ्यात सहभागी होणार असल्याची माहिती समोर येत आहे. हे मंदिर दुबईची राजधानी अबुधाबीमध्ये बांधले जात आहे. अबू धाबीच्या अगदी बाहेर स्थित हे मंदिर देशातील केवळ पहिलेच नाही तर पश्चिम आशियातील सर्वात मोठे मंदिर आहे. हे BAPS हिंदू मंदिर म्हणून ओळखले जात आहे.
मंदिराच्या उभारणीसाठी 700 कोटी रुपये खर्च केले जात आहेत. अबू धाबी शहराच्या बाहेर 50 किलोमीटर अंतरावर आहे. येथे मंदिराच्या उभारणीचे काम जोरात सुरू असून ते आता अंतिम टप्प्यात आले आहे. ही भव्य इमारत तयार करण्यासाठी मोठ्या संख्येने कलाकार, मजूर आणि अभियंते एकत्रितपणे काम करत आहेत. फेब्रुवारी 2024 मध्ये भाविकांसाठी खुले होणारे हे मंदिर इतके मजबूत आहे की 1000 वर्षांपर्यंत या मंदिराला काहीही होणार नसल्याचे सांगण्यात येत आहे.
खरं तर, 2015 मध्ये, जेव्हा पंतप्रधान नरेंद्र मोदी यूएईच्या दौऱ्यावर गेले होते, तेव्हा तिथल्या राष्ट्रपतींनी दुबई-अबू धाबी महामार्गावर 17 एकर जमीन भेट दिली होती. दोन वर्षांनंतर या मंदिराची पायाभरणी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते करण्यात आली. या मंदिराचे बांधकाम हे दोन्ही देश आणि त्यांच्या सरकारांमधील वाढत्या सलोख्याचा पुरावा आहे. पायाभरणी झाल्यापासून मंदिराचे बांधकाम वेगाने सुरू आहे. भारतात ज्यावेळी राम मंदिर भाविकांसाठी खुले होणार आहे त्याच वेळी या मंदिराचे उद्घाटन होणार आहे.
आखाती देशात बांधल्या जाणाऱ्या या मंदिराच्या उभारणीमागील हिंदू संप्रदाय म्हणजे ‘बोचासनवासी अक्षर पुरुषोत्तम स्वामीनारायण संस्था’, जी BAPS संस्था म्हणून ओळखली जाते. कृष्णाचा अवतार म्हणून स्वामीनारायणाची पूजा करण्यासाठी प्रसिद्ध असलेल्या BAPS ने जगभरात 1,100 हून अधिक हिंदू मंदिरे बांधली आहेत. यामध्ये नवी दिल्लीतील अक्षरधाम मंदिर आणि नुकतेच न्यू जर्सी, यूएसए येथे उद्घाटन झालेल्या आशिया बाहेरील सर्वात मोठ्या मंदिराचाही समावेश आहे.
मंदिराचे वैशिष्ट्य
BAPS हिंदू मंदिर हे स्थापत्य पराक्रमाचा जिवंत पुरावा आहे. यात वैदिक वास्तुकला आणि शिल्पकलेपासून प्रेरित गुलाबी वाळूचा खडक आणि संगमरवरी वापरण्यात आला आहे. मंदिरातील अनेक क्लिष्ट कोरीवकाम आणि शिल्पे भारतातील कारागिरांनी तयार केली होती आणि ती साइटवर पोहोचवली होती. मंदिराची उंची 108 फूट असून यामध्ये 40 हजार घनमीटर संगमरवरी आणि 180 हजार घनमीटर वाळूचा खडक वापरण्यात आला आहे.
मंदिराची रचना वैदिक वास्तुकला आणि शिल्पकलेपासून प्रेरित आहे. भारताचे परराष्ट्र मंत्री एस जयशंकर, अभिनेता संजय दत्त आणि अक्षय कुमार यांच्यासह 50,000 हून अधिक लोकांनी मंदिराच्या बांधकामासाठी विटा घातल्या आहेत. मंदिराच्या डिझाईनमध्ये सात शिखर एकत्रित केले जातील, त्यापैकी प्रत्येकावर संयुक्त अरब अमिरातीचे चिन्ह असेल. मंदिर परिसरात मुलांसाठी वर्ग, प्रदर्शन केंद्र आणि खेळाचे मैदानही असेल.
मंदिराचे उद्घाटन कधी होणार?
या मंदिराचे उद्घाटन फेब्रुवारीत होणार असून, त्यात अनेक मान्यवर उपस्थित राहणार आहेत. पंतप्रधान मोदींशिवाय अबुधाबीचे शेख आणि UAE मधील प्रमुख नेत्यांचा त्यात समावेश होऊ शकतो. सर्वप्रथम १० फेब्रुवारीपासून ‘फेस्टिव्हल ऑफ हार्मनी’ सुरू होईल, ज्यामध्ये भारतीय समुदायाचे लोक सहभागी होतील. यानंतर 15 फेब्रुवारी 2024 रोजी मंदिराचे दोन तास चालणाऱ्या सोहळ्यात उद्घाटन होणार आहे.