मुंबई – अभिनेत्री जॅकलीन फर्नांडिसने 15 दिवसांच्या परदेश दौऱ्यावर जाण्यासाठी न्यायालयाकडे परवानगी मागितली आहे. अभिनेत्रीला 2022 च्या IIFA पुरस्कार सोहळ्याला हजेरी लावायची आहे. त्यासाठी तिला अबुधाबीला जावे लागणार आहे.
बॉलीवूड अभिनेत्री जॅकलिन फर्नांडिसचे सुकेश चंद्रशेखरसोबतचे संबंध समोर आल्यापासून ती अडचणीत सापडली आहे. ईडीने जॅकलीनला पूर्णपणे वेठीस धरले आहे. सुकेश चंद्रशेखरच्या मनी लाँड्रिंग प्रकरणात ईडीने अद्याप जॅकलिनला क्लीन चिट न दिल्याने तपास यंत्रणेने जॅकलिनला भारताबाहेर जाण्यास बंदी घातली आहे. या बंदीच्या विरोधात आता जॅकलिनने दिल्लीच्या पटियाला हाऊस कोर्टात दाद मागितली आहे.
अभिनेत्रीने व्यावसायिक कामासाठी परदेशात जाण्याची परवानगी मागितली आहे. यासाठी तिने कोर्टाकडे 15 दिवसांची परवानगी मागितली आहे. जेणेकरून ती अबुधाबी येथे होणाऱ्या आयफा पुरस्कार सोहळ्याला उपस्थित राहू शकेल. जॅकलिनने अबुधाबी तसेच फ्रान्स आणि नेपाळला जाण्यासाठी न्यायालयाकडे परवानगी मागितल्याचे सूत्रांकडून समजते. जॅकलिनला परदेशातील चित्रपट कार्यक्रमाबाबत पत्रकार परिषद घ्यावी लागणार आहे. अर्जात असे सांगण्यात आले होते की, जॅकलीनला 17 ते 22 मे दरम्यान अबुधाबीमध्ये आयफासाठी जायचे आहे. याशिवाय सलमान खानच्या दबंग शोमध्येही परफॉर्म करायचा आहे.
जॅकलिनच्या वकिलाने न्यायालयाला सांगितले की, ईडीने आरोपपत्रात अभिनेत्रीचे नाव आरोपी म्हणून दिलेले नाही. ईडीने कोणतेही कारण न देता जॅकलिनचा पासपोर्ट जप्त केला आहे. तिचा पासपोर्ट जॅकलीला देण्याचे आवाहन करण्यात आले आहे. जॅकलिनचा पासपोर्ट ईडीकडे नसल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे.