कारखान्यातील अधिकाऱ्यांच्या मुलाखती पृथ्वीराज जाचकांनी घेतल्या
भवानीनगर (वार्ताहर) – श्री छत्रपती सहकारी साखर कारखान्याला पुन्हा उर्जित अवस्था निर्माण करण्यासाठी पवार-जाचक यांचे मनोमिलन झाले आहे. तर मंगळवारी (दि. 22) झालेल्या कार्यकारी संचालक व इतर अधिकाऱ्यांच्या मुलाखतीसाठी साखर संघाचे माजी अध्यक्ष पृथ्वीराज जाचक यांना निमंत्रित करण्यात आल्याने पावर-जाचक यांच्यातील कटूता पूर्णत: संपल्यावर शिक्कामोर्तब झाले. तब्बल 17 वर्षांनंतर पृथ्वीराज जाचक यांनी कारखान्याच्या कारभारात “एन्ट्री’ झाली त्यामुळे येणाऱ्या निवडणुकीत जाचक यांचे नाव अध्यक्षपदाच्या रांगेत आग्रभागी असेल, अशी चर्चा कार्यक्षेत्रात जोरदार सुरू आहे.
जाचक व पवार यांच्यामध्ये मनोमिलन घडवून आणण्यासाठी राष्ट्रवादीचे बारामतीचे ज्येष्ठ नगरसेवक किरण गुजर यांची भूमिका महत्त्वाची ठरली व त्यामुळेच जाचक यांना उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या सूचनेवरून कारखान्यामध्ये आज घेण्यात आलेल्या कार्यकारी संचालक व इतर अधिकारी यांच्या मुलाखतीसाठी कारखान्याच्या माध्यमातून निमंत्रित करण्यात आले होते.
जाचक यांनी 2004 मध्ये थेट राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्या विरोधात लोकसभेची निवडणूक लढवली होती. तेव्हापासून जो जाचक पवार विरोध होता तर या विरोधाला मावळायला तब्बल 17 वर्षे लागली. जाचक यांचा साखर कारखान्याबाबतचा असलेला दांडगा अनुभव लक्षात घेता व गाळात रुतलेल्या छत्रपती कारखान्याला बाहेर काढण्यासाठी उपमुख्यमंत्री अजित पवारांनी जाचक यांच्याशी जुळवून घेतले आहे, त्यामुळे कारखान्यात पुढील काळात राजकीय उलथापालथ होईल, अशी चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे.
भाजपने घेतला अक्षेप
पृथ्वीराज जाचक हे कारखान्यात संचालक मंडळाच्या बैठकीस उपस्थित राहिल्याने कारखान्याचे माजी संचालक व भाजपचे जिल्हा सचिव तानाजी थोरात, बारामतीचे भाजपचे तालुकाध्यक्ष पांडुरंग कचरे व लालासाहेब सपकळ यांनी यावर आक्षेप घेऊन काही काळ संचालक मंडळाला धारेवर धरण्याचा प्रयत्न केला. परंतू संचालक मंडळाने त्यास दाद दिली नाही.
मी फक्त निमित्तमात्र आहे. माझ्यावर नैतिक जबाबदारी होती. शरद पवार व अजित पवार यांचा निरोप मी संचालक मंडळास दिला. अजित पवारांनी पृथ्वीराज जाचक यांना कामकाजात सामावून घेण्याचा निर्णय घेतला. त्याचा कारखान्यासह सभासदांना निश्चित फायदा होईल.
– किरण गुजर, ज्येष्ठ नगरसेवक, बारामती