J P Nadda on Eknath Shinde – भाजपने बुधवारपासून गुजरात गौरव यात्रा सुरू केली. गुजरातमध्ये चालू वर्षीच्या अखेरीस विधानसभा निवडणूक होणार आहे. त्या पार्श्वभूमीवर, यात्रेच्या माध्यमातून सत्तारूढ भाजपने एकप्रकारे जनसंपर्क मोहीम हाती घेतली आहे.
भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी.नड्डा यांच्या उपस्थितीत दोन ठिकाणांवरून त्या यात्रेचा प्रारंभ झाला. आता उद्या आणखी तीन ठिकाणांवरून तशाच स्वरूपाच्या यात्रा मार्गक्रमण करतील. यात्रेच्या उद्घाटनप्रसंगी बोलताना नड्डा यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाची आणि कार्याची प्रशंसा केली.
मुख्यमंत्री म्हणून मोदींनी गुजरातला नवी दिशा दाखवल्याचे त्यांनी म्हटले. नड्डा यांनी कॉंग्रेसवर जोरदार टीकास्त्र सोडले. देशात आता भाजपच खऱ्याअर्थी आणि एकमेव राष्ट्रीय पक्ष आहे. कॉंग्रेस भाऊ-बहिणीच्या पक्षापुरता मर्यादित आहे. इतर प्रादेशिक पक्ष घराणेशाहीवर आधारित आहेत, असे त्यांनी म्हटले.
फुटीमुळे शिवसेना वाचली
महाराष्ट्रातील राजकीय घडामोडींचा संदर्भ देऊन नड्डा यांनी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधला. फुटीमुळे शिवसेना वाचली. अन्यथा, एका परिवाराकडून चालवला जाणारा तो पक्ष ठरला असता. आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे पुढे येऊन विचारसरणीविषयी बोलत आहेत, असे ते म्हणाले.