नवी दिल्ली – करोना संसर्गाच्या दुसऱ्या लाटेने भारतात कहर माजवला. आता करोनाची तिसरी लाट येणार असल्याची शक्यता व्यक्त करण्यात आहे. त्यातच करोनाचा अतिघातक डेल्टा प्लस विषाणू देशात आढळून आला आहे. त्यामुळे करोना लसीकरण वेगाने करण्यात येत आहे. यातच आता भारताला करोनाची आणखी एक लस मिळणार आहे.
जुलैमध्ये अर्थात पुढील महिन्यात जॉन्सन अँड जॉन्सनच्या करोना प्रतिबंधक लसीला भारतात परवानगी मिळण्याची शक्यता आहे. सुरुवातीला या लसीचे केवळ १ हजार डोस उपलब्ध होणार आहेत. विशेष म्हणजे जॉन्सन अँड जॉन्सनच्या करोना लसीचा केवळ सिंगल डोस घ्यावा लागणार आहे. ही लस सुमारे 1850 रुपयापर्यंत उपलब्ध होऊ शकेल.
देशात जॉन्सन अँड जॉन्सनच्या लशीची खऱेदी खासगी क्षेत्राच्या माध्यमातून कऱण्यात येणार आहे. खासगी क्षेत्र अत्यंत कमी प्रमाणात या लसीचे डोस खरेदी करू शकणार आहेत. तर लस खरेदीसंदर्भात सरकारकडून अद्याप काहीही स्पष्ट कऱण्यात आलेलं नाही.
सध्या भारतात कोविशिल्ड, कोव्हॅक्सिन आणि रशियाची स्पूटनिक व्ही लस देण्यात येत आहे. तर फायझर लसीबाबतची प्रक्रिया अंतिम टप्प्यात असून, लवकरच फायझरची करोना प्रतिबंधक लसही भारतात उपलब्ध होईल, असं सांगितले जात आहे.