नवी दिल्ली : चीनसह अनेक देशांमध्ये करोनाचे रुग्ण वाढत आहेत. त्यातच केंद्र सरकार सध्या अलर्ट मोडवर असून मागच्या आठवड्यात परवानागी देण्यात आलेली भारत बायोटेकची नाकावाटे देण्यात येणारी लस लवकरच बाजारात विक्रीसाठी उपलब्ध होणार आहे. समोर आलेल्या माहितीनुसार, भारत बायोटेकची नाकावाटे देण्यात येणारी लसीची किंमत एक हजार रुपये असणार आहे. यामध्ये लसीची किंमत 800 रुपये आणि 200 रुपये जीएसटी, रुग्णालयाचे चार्ज असणर आहे.
गेल्या आठवड्यात भारत बायोटेकच्या इंट्रानेजल वॅक्सीन iNCOVACC करोना लसीला बूस्टर डोस म्हणून वापरण्यासाठी केंद्र सरकारने मंजुरी दिली आहे. या वॅक्सिनची किंमत 800 रुपये आणि जीएसटी पाच टक्के असणार आहे. इंट्रानेजल वॅक्सीन iNCOVACC कोवॅक्सीन आणि कोव्हिशिल्डचे लसीचे दोन डोस पूर्ण केलेल्यांना बूस्टर डोस म्हणून परवानगी देण्यात आली आहे.
मीडिया रिपोर्टनुसार, जानेवारी महिन्याच्या अखेरपर्यंत ही लस करोना लसीचे दोन डोस पूर्ण झालेल्या नागिरकांना उपलब्ध होणार आहे. मनीकंट्रोलच्या रिपोर्टनुसार, खासगी रुग्णालयात करोना लसीच्या एका डोसला 150 रुपये दर आकारण्याची परवानगी दिली आहे. ही रक्कम जोडून करोना लसीची किंमत हजार रुपये होण्याची शक्यता आहे.
नेझल कोरोनो वॅक्सिन सेंट लुईस येथील वॉश्गिंटन विद्यापीठात विकसीत करण्यात आली आहे. भारत बायोटेकची iNCOVACC या इंट्रानेझल कोविड-19 लसीचा पर्याय कोविन ॲपवर उपलब्ध करुन देण्यात आला आहे. 18 वर्ष आणि त्यावरील वयोगटातील लोकांना नेझल करोना वॅक्सिनचा बूस्टर डोस घेता येईल. आधी ही लस खाजगी लसीकरण केंद्रवर उपलब्ध होणार आहे.