नवी दिल्ली- कोर्बेव्हॅक्स या लसीला डीसीजीआयने आपत्कालीन परिस्थितीत बुस्टर डोस म्हणून वापर करण्यास मान्यता दिली आहे. ही लस हैदरबाद येथील बायोलॉजिकल ई लिमिटेड या औषधनिर्मिती करणाऱ्या कंपनीने तयार केली आहे.
देशात करोना रुग्णांची संख्या पुन्हा एकदा वाढू लागलेली आहे. राज्यात मास्क लावण्याचे आवाहन केले जात आहे. असे असताना आता डीसीजीआयच्या या निर्णयानंतर आता कोव्हिशील्ड किंवा कोव्हॅक्सीन लस घेतलेल्या 18 वर्षांपेक्षा जास्त वय असलेल्या नागरिकांना लस घेतल्याच्या सहा महिन्यानंतर कोर्बेव्हॅक्स ही लस बुस्टर डोस म्हणून घेता येईल.
डीसीजीआयच्या या निर्णयानंतर या लसीच्या माध्यमातून बुस्टर डोसची गरज पूर्ण होईल. करोना प्रतिबंधक लसीकरणाच्या प्रवासात आपण आणखी एक टप्पा पूर्ण केला आहे, अशी प्रतिक्रिया बायोलॉजिकल ई. लिमिटेड या कंपनीच्या व्यवस्थापकीय संचालकांनी दिली आहे.