नवी दिल्ली – देशातील 4 कोटी नागरिकांनी अद्याप करोनालसींचा एकही डोस घेतलेला नसल्याची माहिती केंद्र सरकारकडून देण्यात आली. त्यामुळे लस घेण्याबाबत अजूनही अनेक जण टाळाटाळ करत असल्याचे समोर आले.
केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री भारती पवार यांनी शुक्रवारी लोकसभेत करोनालसींशी संबंधित आकडेवारी सादर केली. देशातील नागरिकांना आतापर्यंत देण्यात आलेल्या करोनालसींच्या डोस संख्येने याआधीच 200 कोटींचा टप्पा ओलांडला आहे. देशातील 18 वर्षांवरील प्रौढांपैकी 98 टक्के जणांना किमान एक डोस मिळाला आहे. तर, दोन्ही डोस मिळाल्याने 90 टक्के प्रौढांचे लसीकरण पूर्ण झाले आहे.
सरकारी लसीकरण केंद्रांमध्ये 178 कोटींहून अधिक (97.34 टक्के) मोफत डोस देण्यात आले. देशात सध्या 12 वर्षांवरील सर्व करोनालसींचे डोस घेण्यास पात्र आहेत. भारताने आतापर्यंत 101 देशांना आणि संयुक्त राष्ट्रांशी संबंधित संस्थांना लसींचे डोस पुरवले. त्यांची संख्या जवळपास 24 कोटी इतकी आहे.