मॉस्को – रशियाचे राष्ट्रपती ब्लादीमीर पुतीन यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची विचार करण्याची पध्दत आणि त्यांची धोरणे यांची मुक्तकंठाने प्रशंसा केली आहे. भारताच्या हिताच्या विरोधातील मुद्दा जर असेल तर मोदींवर दबाव टाकणे अत्यंत अवघड असल्याचे पुतीन यांनी म्हटले आहे.
भारत आणि रशिया या दोन देशांमधील चांगल्या संबंधांबाबत पुतीन यांचे विचार मांडणारा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होतो आहे. त्यात पुतीन मोदी यांची प्रशंसा करताना दिसत आहेत. मोदींची धोरणे ही भारत आणि रशियातील दृढ संबंधांची गॅरंटी असल्याचेही त्यांनी म्हटले आहे.
भारत- रशिया संबंधांत सातत्याने प्रत्येक दिशेने प्रगती होते आहे. त्याला मोदींची धोरणे महत्वाची आहेत. भारताच्या राष्ट्रीय हिताच्या विरोधात, भारतीय लोकांच्या विरोधात कोणता निर्णय घेण्यासाठी मोदी यांना घाबरवले जाऊ शकते अथवा धमकावले जाऊ शकते याची मी कल्पनाही करू शकत नाही. त्याचे कारण त्यांच्यावर या कशाचाही दबाव येणार नाही.
त्यामुळे आम्हीही कधी यासंदर्भात त्यांच्याशी कधी चर्चाही केली नाही. फक्त बाहेरून काही होत आहे का याची मी पाहणी करतो आहे. अगदी प्रामाणिकपणे सांगायाचे तर भारतीय नागरिकांच्या राष्ट्रीय हितांच्या संदर्भात मोदी यांच्या असलेल्या ठाम आणि ठोस भूमिकेमुळे मला आश्चर्यही वाटते असे पुतीन यांनी म्हटले आहे.
कठोर निर्णय घेण्याबाबत मोदींची प्रशंसा करणारा पुतीन यांचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर अचानक आल्यामुळे भारतातील लोकही चकित झाले आहेत. या व्हिडिओतील पूर्ण आवाज हिंदीतील आहे. तसेच पुतीन भारत आणि रशियाच्या संबंधांबाबत अगदी सविस्तरपणे बोलताना दिसत आहेत.
दरम्यान, रशियाच्या राष्ट्रपती पदाच्या निवडणुकीची तारीखही आता निश्चित झाली असून १७ मार्च २०२४ रोजी मतदान होणार आहे. तत्पूर्वी पुन्हा एकदा पुतीन यांना राष्ट्रपती होता यावे यासाठी त्यांच्या मार्गातील सर्व अडथळे आता रशियाच्या संसद सदस्यांनीच दूर करून टाकले आहेत. ७१ वर्षीय पुतीन यांनी अद्याप निवडणूक लढण्याबाबत घोषणा केलेली नाही.
तथापि, निवडणुकीच्या काही दिवस अगोदर ते घोषणा करू शकतात असेही मानले जाते आहे. रशियाच्या घटनेत बुधवारीच दुरूस्ती करण्यात आली आहे. त्यानुसार पुतीन आणखी दोन वेळा रशियाचे राष्ट्रपती होऊ शकतील आणि त्यांचा हा कार्यकाळ प्रत्येकी सहा वर्षांचा असेल.