न्यूयॉर्क – टेस्ला कंपनीचे प्रमुख ऍलन मस्क यांनी ट्विटर कंपनी खरेदी करण्याचा मनोदय जाहीर केला आहे. मात्र ट्विटरमधील बरेच गुंतवणूकदार मस्क यांना विरोध करण्याच्या मनस्थितीत आहेत.
ट्विटर कंपनी कंपनीत सौदी अरेबियाचे अलवाल लीद बिन तलाल यांची बऱ्याच वर्षापासून मोठी गुंतवणूक आहे. कंपनी विकण्यास अलवाल लीद बिन तलाल यांनी कडवा विरोध केला आहे. त्यांनी सांगितले की मस्क ट्विटर कंपनीसाठी 43 अब्ज डॉलर देऊ करीत आहेत. मात्र ट्विटर कंपनीची किंमत यापेक्षा कितीतरी जास्त आहे. त्यामुळे ही कंपनी मस्क यांना विकण्यास आपला विरोध राहील.
त्यानंतर मस्क यांनी ट्विटवरून दलाल यांच्या भूमिकेला विरोध केला आहे. त्यांनी ट्विटरवरून दोन प्रश्न विचारले आहेत. पहिला प्रश्न हा की अलवाल लीद बिन तलाल यांचे प्रत्यक्ष-अप्रत्यक्षरीत्या ट्विटर मध्ये किती गुंतवणूक आहे. तर दुसरा प्रश्न आहे की अलवाल लीद बिन तलाल यांना अभिव्यक्ति स्वातंत्र्या संदर्भात काय वाटते.
प्राप्त माहितीनुसार अलवाल लीद बिन तलाल यांच्याकडे ट्विटरचे 5.2 टक्के भागभांडवल आहे. तर मस्क यांच्याकडे नऊ टक्के भागभांडवल आहे. एक जानेवारीपासून मस्क यांनी ट्विटरचे शेअर खरेदी करण्यास सुरुवात केली होती. मात्र त्यांनी या संदर्भातील माहिती गेल्या आठवड्यात जाहीर केली आहे. त्यांनी ही माहिती इतके दिवस का जाहीर केली नाही. यासाठी ट्विटरच्या बऱ्याच गुंतवणूकदारांनी मस्क यांच्या विरोधात खटला दाखल करण्याचा निर्णय घेतला आहे.
त्यामुळे ट्विटर खरेदीसाठी मस्क यांना आगामी काळात अनेक कायदेशीर लढायाला तोंड द्यावे लागण्याची शक्यता आहे. दरम्यान ट्विटर खरेदी करण्यासाठी म्हस्क यांच्याकडून ट्विटरच्या व्यवस्थापनावर कसलाही दबाव नाही. मस्क यांनी केवळ प्रस्ताव पुढे केला आहे असे ट्विटरचे मुख्य कार्यकारी अधिकारी पराग अगरवाल यांनी म्हटले आहे.