वॉशिंग्टन – भारतीय अवकाश संशोधन संस्थेची (इस्त्रो) व्यावसायिक शाखा असणाऱ्या अंतरिक्ष कॉर्पोरेशनच्या विरोधात अमेरिकी न्यायालयाने निकाल दिला आहे. त्यानुसार, उपग्रह निर्मितीचा करार रद्द केल्याबद्दल देवास मल्टिमीडिया या बंगळूरस्थित स्टार्टअप कंपनीला 9 हजार कोटी रूपयांची भरपाई देण्याचा आदेश अंतरिक्षला देण्यात आला आहे.
अंतरिक्ष आणि देवासमध्ये जानेवारी 2005 ला करार झाला. त्या करारांतर्गत अंतरिक्ष देवाससाठी दोन उपग्रहांची निर्मिती करून त्यांचे प्रक्षेपण आणि संचालन करणार होती. त्याशिवाय, देवासला एस-बॅंड स्पेक्ट्रमचे 70 मेगाहर्टझ उपलब्ध केले जाणार होते.
त्या स्पेक्ट्रमच्या माध्यमातून देवास संपूर्ण भारतात उपग्रह आणि दळणवळणविषयक सेवा उपलब्ध करणार होती. मात्र, तो करार अंतरिक्षने फेब्रुवारी 2011 मध्ये संपुष्टात आणला. त्यानंतर देवासने भारतात न्यायालयीन लढा दिला. सर्वोच्च न्यायालयाने त्याप्रकरणी देवासला लवादाकडे दाद मागण्यास सांगितले.
नंतर देवासने सप्टेंबर 2018 मध्ये अमेरिकी न्यायालयात धाव घेतली. देवासने दाखल केलेल्या खटल्याला आव्हान देत अंतरिक्षने कार्यक्षेत्राचा मुद्दा उपस्थित केला. त्यावर आक्षेप घेत देवासने अमेरिकेत अंतरिक्षचे कामकाज चालत असल्याकडे लक्ष वेधले. त्यावर शिक्कामोर्तब करत अमेरिकी न्यायालयाने खटल्याचे कामकाज चालवले.