नवी दिल्ली – गाझामधील तात्पुरता युद्धविराम आणि ओलिसांच्या सुटकेसाठी कैरोमध्ये आयोजित करण्यात आलेल्या वाटाघाटींमधून इस्रायलने माघार घेतली आहे.वाटाघाटींपूर्वी हमासने आपल्या ताब्यात असलेल्या इस्रायली नागरिकांची यादी उपलब्ध करून द्यावी आणि या यादीमध्ये जिवंत असलेल्या इस्रायली नागरिकांचा स्पष्ट उल्लेख करण्यात यावा, अशी मागणी इस्रायलने केली होती.
इस्रायलच्या तुरुंगात असलेल्या पॅलेस्टिनींच्या आदला-बदलीच्या नियोजनासाठी ही यादी आवश्यक होती. मात्र तशी यादी हमासकडून न मिळाल्याने इस्रायलने या वाटाघाटींमधून माघार घेतली आहे.
हमासने या अटींचे पालन केले नसल्यामुळे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांनी मोसादचे संचालक डेव्हिड बर्निया यांच्या समन्वयाने हा निर्णय घेतला आहे, असे इस्रायलच्या प्रवक्त्याने म्हटले आहे. युद्धविरामाच्या चर्चेसाठी इस्रायलने तत्वतः मान्यता दिली असल्याचे अमेरिकेचे अद्यक्ष ज्यो बायडेन यांनी दोनच दिवसांपूर्वी सांगितले होते. त्यामुळे चर्चेनंतर युद्धविराम होण्याची शक्यता निर्माण झाली होती.
हमासचे शिष्टमंडळ रविवारी कैरो येथे आले आणि या चर्चेमुळे शत्रुत्व संपुष्टात येईल, अशी आशा व्यक्त केली होती. तथापि, हमासने इस्रायलच्या अटींचे पालन केले आहे की नाही याबद्दल हमासने अद्याप प्रतिसाद दिलेला नाही.