नवी दिल्ली – दक्षिण चीन समुद्रातील चीनच्या वाढत्या आव्हानाचा मुकाबला करण्यासाठी अन्य देशांनी एकत्र येण्याचे आवाहन फिलिपाईन्सने केले आहे. मेलबर्न येथे आयोजित आंतरराष्ट्रीय थिंक टँकच्या परिषदेमध्ये बोलताना फिलिपाईन्सचे अध्यक्ष फर्डिनांड मार्कोस ज्युनिअर यांनी अन्य देशांना एकत्र येण्याचे आवाहन केले आहे. दक्षिण चीन समुद्रामध्ये आंतरराष्ट्रीय कायदे, चिथावणीखोरपणा, एकतर्फी आणि बेकायदेशीरपणे केलेली कृती आपल्या सार्वभौम हक्कांना आणि अधिकार क्षेत्रांना धोका पोचवत आहे. हे दुर्दैवी आहे, असे ते म्हणाले.
जगातील महत्वाचा सागरी मार्ग असलेल्या दक्षिण चीन समुद्राच्या बहुतेक भागावर चीनकडून हक्क सांगितला जातो आहे. याला फिलिपाईन्स, व्हिएतनाम, मलेशिया, तैवान आणि ब्रुनेई या देशांकडून देखील या सागरी मार्गाच्या वापराच्या अधिकारांचा दावा केला जातो आहे.
मेलबर्न येथे आयोजित असोसिएशन ऑफ साऊथ इस्ट नेशन्सच्या बैठकीमध्ये बोलताना मार्कोस यांनी या सर्व देशांनी एकत्र येण्याचे आवाहन केले. चीनविरोधात एकत्र येण्याची कृती धोरणाचा भाग नाही. मात्र त्याशिवाय गत्यंतर देखील नाही. आपल्या सार्वभौम भूमीच्या रक्षणाचे कर्तव्यच आहे. एखाद्या देशाच्या नेत्याचे ते प्राधान्याचे कर्तव्य आहे.
फिलिपाईन्सला धमकावले जाऊ शकत नाही. जर धमकावण्याचा प्रयत्न केला गेला, तर त्याला उत्तर देणे हे आमचे कर्तव्यच असेल, असेही ते म्हणाले.
दक्षिण तीन समुद्रात चीनला धमकावण्याचा प्रयत्न फिलिपाईन्सकडून केला जात असल्याचा आरोपचीनच्या प्रवक्त्याने केला आहे. या अनुषंगानेमार्कोस बोलत होते.
आसियान परिषदेचे यजमान असलेल्या ऑस्ट्रेलियाच्या परराष्ट्रमंत्री पेनी वोंग यांनी फिलिपाईन्सच्या मताशी आपण सहमत असल्याचे यावेळी सांगितले.