नवी दिल्ली – गेल्या आठवड्यात इराणने इस्रायलवर क्षेपणास्त्राचा हल्ला केल्यानंतर एक आठवड्यापासून सोने आणि चांदीच्या दरात एकतर्फी वाढ होऊन हे दर रोज नव्या विक्रमी पातळीवर जात आहेत. त्यामुळे सोने आणि चांदी घेणे सर्वसामान्यांच्या आवाक्याबाहेर गेलेले आहे. मात्र ही परिस्थिती आणखी चिघळत जाऊ शकते असा इशारा विश्लेषक देत आहेत.
एलकेपी सिक्युरिटीज या संस्थेचे उपाध्यक्ष जतीन त्रिवेदी यांनी सांगितले की, जोपर्यंत मध्य पूर्वेतील तणाव निवळत नाही तोपर्यंत सोने आणि चांदीचे दर वाढत राहण्याची शक्यता आहे. कारण युद्धामुळे जागतिक व्यापारावर परिणाम तर होऊ शकतो. त्याचबरोबर अमेरिकेचा डॉलरही वधारत आहे.
दिल्ली सराफात सोन्याचा दर आज 700 रुपयांनी वाढून 73,750 रुपये प्रति दहा ग्रॅम या पातळीवर गेला. चांदीचा दर 800 रुपयांनी वाढून 86,500 रुपये प्रति किलो या पातळीवर गेला. जागतिक बाजारात सोन्याचा दर तब्बल 2,370 डॉलर या पातळीवर गेला आहे. एकाच दिवसात सोन्याच्या दरात 15 डॉलरची वाढ झाली आहे. चांदीचा दर 28.40 डॉलर प्रति औंस या पातळीवर गेला.
अमेरिकेतील महागाई आणि इराण – इस्त्रायल संघर्ष या कारणामुळे जगभरातील गुंतवणूकदार सोने अमेरिकन डॉलर अमेरिकेचे कर्जरोखे अशा सुरक्षित गुंतवणूक साधनाकडे वळत असल्याचे दिसून येत आहे. इस्रायल-इराणमध्ये 1 एप्रिलपासून तणाव सुरू झाला. तेव्हा सोन्याचा भाव 68,964 होता. प्रत्येक युद्धाच्या काळात सोन्याच्या किमती नेहमीच वाढल्या आहेत. 1990-91 च्या आखाती युद्धात सोन्याच्या किमतीत वाढ झाली होती, पण ती अल्पकालीन होती. त्याचप्रमाणे 2003 मध्ये इराक युद्धाच्या वेळी सोन्याचे भाव वाढले होते.