Israel-Hamas War : आंतरराष्ट्रीय स्तरावर सध्या इस्रायल आणि पॅलेस्टिन (Israel Palestine Conflict) यांच्यातील युद्धाने एकच गोंधळ उडाला आहे. माणुसकीची परिसीमा या युद्धात गाठली गेली असल्याचे दिसून आले. दरम्यान या युद्धाचा आजचा २७ वा दिवस आहे. यात गाझा पट्टी (Gaza Strip) त निरपराध लोकांचा बळी जात आहे. इस्रायलवर हमासने केलेल्या हल्ल्यानंतर गाझा पट्टीतून हमासचा खात्मा करण्यासाठी त्यांचे लष्कर सातत्याने बॉम्बचा वर्षाव करत आहे. इस्रायली लष्कराने प्रत्युत्तरादाखल केलेल्या कारवाईमुळे गाझा पट्टीमध्ये मरण पावलेल्या पॅलेस्टिनींची संख्या 9200 हून अधिक झाली आहे. यातील बहुतांश मुले आहेत.
इस्रायलच्या आयर्न डोम डिफेन्स सिस्टीमची जगभर चर्चा आहे. या युद्धात खरी गेमचेंजर म्हणजे बाण क्षेपणास्त्र संरक्षण प्रणाली आहे. यापूर्वी इस्त्रायलचे संरक्षण मंत्री योव गॅलंट यांनी आपण युद्धाच्या शिखरावर असल्याचे स्पष्ट केले आहे. गाझा शहरातील बिल्ट-अप भागात तीव्र लढाई सुरू आहे. IDF सैनिक धैर्याने आणि दृढनिश्चयाने लढत आहेत, त्यांच्या ध्येयाशी बांधिलकी दाखवत आहेत.
गाझामध्ये आतापर्यंत 9000 हून अधिक लोकांचा मृत्यू झाला आहे. यात हमासचे शेकडो सैनिक मारले गेले आहेत. इस्रायली सैन्याने आतापर्यंत हमासचे 11 हजाराहून अधिक तळ उद्ध्वस्त केले आहेत. हमासशिवाय लेबनॉनची दहशतवादी संघटना हिजबुल्ला आणि येमेनची अतिरेकी संघटना हौथीही इस्रायलवर हल्ले करत आहेत. अशा परिस्थितीत इस्त्रायल एकाच वेळी सर्वांना चोख प्रत्युत्तर देत आहे.
गाझाच्या आरोग्य मंत्रालयाने म्हटले आहे की, गाझा शहरातील रुग्णवाहिकेच्या ताफ्यावर झालेल्या हल्ल्यात किमान 15 लोकांचा मृत्यू झाला आहे. इस्रायलनेही या हल्ल्याला दुजोरा दिला आहे. पण रुग्णवाहिकेत हमासचे सैनिक होते, असे त्यात म्हटले आहे. या ताफ्यात पाच रुग्णवाहिकांचा समावेश होता, ज्या रफाह क्रॉसिंगकडे जात होत्या. गाझामधील सफ्तावी भागातील एका शाळेत आश्रय घेतला होता. मात्र, इस्त्रायलच्या हवाई हल्ल्यात तेथे राहणाऱ्या 20 लोकांचा मृत्यू झाला आहे. असाच एक हल्ला किनारी भागात झाला, जिथे दक्षिणेकडे जाणाऱ्या लोकांवर हवाई हल्ला करण्यात आला, यामध्ये सुमारे 14 जणांना प्राण गमवावे लागले. दरम्यान, आंतरराष्ट्रीय स्तरावर हे युद्ध थांबण्यासाठी शर्थीचे प्रयत्न करण्यात येत आहेत. मात्र इस्रायलकडून युद्धविराम देण्यास नकार देण्यात आला आहे.