company gifts cars to empolyees : दरवर्षी दिवाळीत नोकरदार वर्गाला वेध लागत ते बोनसचे. बोनस मिळाल्यानंतर ठरवलेल्या गोष्टी पूर्ण करता येतील असा त्याचा विचार असतो. पण जर तुम्हाला तुमच्या कंपनीकडून दिवाळी गिफ्ट म्हणून जर मालकाने कार दिली तर…होय, असं होऊ शकत किंबहुना हे घडलं आहे. एका कंपनीकडून आपल्या कर्मचाऱ्यांना दिवाळीचे गिफ्ट म्हणून आलिशान कार देण्यात आल्या आहेत. या कर्मचाऱ्यांमध्ये एका हेल्पर्सचादेखील समावेश आहे.
हरियाणातील ‘मिट्सकार्ट’ या फार्मा कंपनीने आपल्या कर्मचाऱ्यांना दिवाळीचे हे आलिशान गिफ्ट दिले आहे. कंपनीचे मालक एमके भाटिया यांनी कंपनीतल्या आपल्या १२ कर्मचाऱ्यांना नव्या कोऱ्या टाटा पंच कार्स भेट म्हणून दिल्या आहेत. या ‘हस्तांतरण’ सोहळ्याचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर सध्या व्हायरल झाले आहेत. एका इंग्रजी वृत्तवाहिनीने याविषयी माहिती दिली आहे. हा अनोखा ‘भेटवस्तू’ सोहळा महिन्याभरापूर्वी झाल्याचे सांगण्यात येत आहे.
आपल्या या निर्णयामागे नेमकं काय कारण होतं, यासंदर्भात एमके भाटिया यांनी माध्यमांशी बोलताना भूमिका स्पष्ट केली आहे. “या कर्मचाऱ्यांची कामाबद्दलची निष्ठा आणि कठोर मेहनतीमुळे मी प्रभावित झालो होतो. त्यामुळे मी निर्णय घेतला की त्यांना यंदा एक स्पेशल गिफ्ट द्यावं”, काही वर्षांपूर्वीच भाटिया यांनी मिट्सकार्ट ही कंपनी सुरू केली आहे. कार्स गिफ्ट देण्यात आलेले सर्व कर्मचारी सुरुवातीपासून त्यांच्यासोबत काम करत आहेत.
एमके भाटिया यांनी,”हे सर्व कर्मचारी माझ्या कंपनीशी निष्ठावान होते. तसेच, त्यांनी कंपनीच्या विकासासाठी, व्यवसायवृद्धीसाठी कठोर मेहनत घेतली आहे. मला त्यांना विशेष फीलिंग द्यायचं होतं. एखाद्या सेलिब्रिटीप्रमाणे. एका चांगल्या सकारात्मक विचारामुळे हे शक्य होओऊ शकलं. कंपनीनं आजपर्यंत अनेक चढ-उतार पाहिले. पण या काळात हे सगळे कंपनीसोबतच राहिले आणि कंपनीच्या वृद्धीसाठी त्यांनी मदत केली. ते आमचे स्टार आहेत”.असे म्हटले आहे.
दरम्यान, गिफ्ट कार्सचा आकडा फक्त १२ पर्यंत न ठेवला तो ५० पर्यंत न्यायचा आपला विचार असल्याचे एमके भाटिया यांनी म्हटले आहे. महिन्याभरापूर्वी आपण या कार्स गिफ्ट केल्या आहेत. पण आत्ता ही बातमी सगळीकडे व्हायरल होऊ लागली आहे. मी या दृष्टीने काहीही केलं नव्हतं, असेही त्यांनी यावेळी म्हटले.