Israel-Hamas war : गाझापट्टीत इस्रायल आणि हमास यांच्यातील युद्धविरामानंतर इस्रायलकडून पुन्हा एकदा गाझापट्टीवर बॉम्बहल्ले करण्यात आले. दरम्यान युद्धविरामाच्या काळात जगभरातून गाझातील नागरिकांसाठी जी मदत पाठवण्यात आली होती, त्यावर हमासच्या दहशतवाद्यांनी डल्ला मारला असल्याचा दावा इस्रायलने केला आहे.
इस्रायल संरक्षण दलाने आज या सोशल मीडिया साईटवर एक व्हिडिओ पोस्ट करून हमासवर मदत चोरल्याचा आरोप केला आहे. हमासने सामान्य नागरिकांना मारहाण करून गाझामध्ये पाठवलेली मानवतावादी मदत पळवून नेली असल्याचे व्हिडिओमध्ये दिसत स्पष्टपणे दिसत आहे.
इस्रायल संरक्षण दलाने शेअर केलेल्या व्हिडिओमध्ये काही लोकांना मारहाण होत असल्याचे दिसत आहे. तसेच काही लोक मदतीसाठी आलेल्या व्हॅनमधून सामान काढून आपल्या गाडीत भरत असल्याचे दिसत आहे. या व्हिडिओच्या कॅप्शनमध्ये इस्रायलने लिहिले की, हमासच्या दहशतवाद्यांनी मानवतावादी मदत पळवून नेली आहे. अनेक आंतरराष्ट्रीय संघटनांनी ही मदत गाझामध्ये पाठविली होती. गाझातल्या सामान्य लोकांना पुढे करून अशाप्रकारे हमास दहशतवादी कारवायांसाठी रसद मिळवत आहे.असे म्हटले आहे.
Hamas members beat civilians and steal the humanitarian aid they received from international organizations—facilitated by Israel.
Hamas puts its terrorist goals over Gazans’ needs. pic.twitter.com/lFuaWU0bdx
— Israel Defense Forces (@IDF) December 9, 2023
दरम्यान इस्रायल संरक्षण दलाने, गाझामधील अल-मवासी हा मानवतावादी परिसर म्हणून जाहीर करण्यात आलेला आहे. सामान्य लोकांना युद्धाची झळ बसू नये, यासाठी ही तरतूद केली आहे. मात्र हमासचे दहशतवादी गाझाला युद्धाच्या आगीत ढकलत आहेत. हमासने मानवतावादी परिसरातून अनेक रॉकेट्स डागले आहेत. या रॉकेट्समुळे गाझातील सामान्य लोकांसमोर आणखी धोका निर्माण झाला आहे.
हमासकडून इस्रायली लष्करावर हल्ला करण्यासाठी शाळा आणि मशिदीचा वापर करण्यात येत आहे, असेही इस्रायल संरक्षण दलाने शनिवारी सांगितले. तसेच हमासकडून पायाभूत सुविधांचा वापर करून इस्रायली सैनिकांवर हल्ला केला जात आहे.
दरम्यान आयडीएफचे प्रवक्ते डॅनिअल हगारी म्हणाले की, गाझापट्टीतील हमासच्या अनेक सैनिकांनी इस्रायली लष्करासमोर शरणागती पत्करत आत्मसमर्पण केले आहे. या सैनिकांकडून हमासची गुप्त माहिती इस्रायली लष्काराला मिळत आहे. इस्रायलविरोधात हमासकडून कशापद्धतीने छुपा हल्ला केला जातो, याचीही माहिती या सैनिकांकडून मिळवली जात आहे. आत्मसमर्पण केलेल्या सैनिकांनी त्यांचे शस्त्र आणि इतर उपकरणे इस्रायलच्या ताब्यात दिली आहेत.